दिव्यांग बांधवांचे प्रश्न न सुटल्यास १० मार्च नंतर आमरण उपोषण…
कणकवली
दिव्यांग बांधवांना मदत म्हणून शासनाकडून प्रत्येक महिन्याला १ हजार रूपये पेन्शन दिली जाते. मात्र ऑक्टोबर २०२२ पासून ही पेन्शन रक्कम अद्यापही मिळालेली नाही अशी माहिती एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी आज दिली. तसेच दिव्यांग बांधवांचे शासन दरबारी असलेले पुढील पंधरा दिवसांत न सुटल्यास १० मार्च पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
श्री.सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, शासन दिव्यांग बांधवांना आधीच तुटपुंजी एक हजार रूपयांची पेन्शन देत आहे. मात्र चार चार महिने ही पेन्शन दिली जात नसेल तर दिव्यांग बांधवांनी करायचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिव्यांग बांधवांच्या या समस्यांबाबत पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. तसेच नुकतेच कणकवलीत दिव्यांग बांधवांचे शिबिर घेऊनही दिव्यांग बांधवांच्या समस्या मांडण्यात आल्या. परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधीने या समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही केलेली नाही.
सावंत म्हणाले, दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषदेकडे जमा होणाऱ्या सेसमधून मिळणारे अनुदान देखील कमी करण्यात आले आहे. याखेरीज दिव्यांगांच्या अनेक योजनाही बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्यांबाबतची निवेदने लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक पुढील पंधरा दिवसांत न झाल्यास १० मार्च पासून आमरण उपोषण छेडले जाणार आहे.दिव्यांगांसाठीच्या १५ तीन चाकी धूळ खात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कणकवली विभागातील दिव्यांग बांधवांसाठी १५ तीन चाकी सायकल पाठविण्यात आल्या होत्या. या सायकली सध्या कणकवली उपजिल्हा रूग्णालयात धूळ खात पडल्या आहेत. जर दिव्यांगांसाठी या सायकल आल्या होत्या तर त्या वितरीत का करण्यात आल्या नाहीत असाही सवाल श्री.सावंत यांनी उपस्थित केला.