*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*
*थोडंसं मनातलं…!*
*चला वेळ पाळूया, रहदारी🚚🚲🛵🏍️ आणि अपघात कमी करूया*
सध्या गाडयांमुळे,मग त्या लहान-मोठया असो की दुचाकी किंवा चार चाकी असो यामुळे रहदारी खूप झाली आहे. रस्त्यावर चालणं सुद्धा अवघड झालं आहे. अहो आपण रस्त्यावर उभं असतानाही मागून एखादी गाडी आपल्याला टक्कर देते. आता रस्त्यावर उभे राहताना आणि चालतानाही मागं पुढं पहावं की काय असा प्रश्नच असतो. त्यातल्या त्यात काही ठराविक वेळी ही रहदारी जरा जास्तच असतं असं जाणवतं.उदाहरणार्थ शाळा, कॉलेजेस,आणि ऑफिसेसच्या वेळी ही गर्दी भयंकर असते.
हे थोडंसं लक्षात आल्यावर असं वाटलं की यावर काही उपाय असू शकतो का? तेव्हा असं वाटलं की प्रत्येक शहरात या तोबा गर्दीवर काही करता येईल का? “इच्छा तिथे मार्ग” किंवा “गरज हि शोधाची जननी आहे” याप्रमाणे रहदारी कमी करण्यासाठी किंवा अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मी पण मार्ग शोधू लागले.मग मला वाटलं की आपण एक काम करू शकतो.
आपण रहदारी कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकेल असा विचार करतो, पण प्रत्येक व्यक्तीने ठरविल्यास यावर नक्की काही प्रमाणात फरक पडेल असं मला वाटतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे शाळा, कॉलेज, ऑफिस यांची वेळ तर आपण बदलू शकत नाही. पण मैत्रिणींनो आपण ज्यांना शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी वेळेत जायचे नसेल तर त्यांची वेळ सोडून आपण आपली बाहेरची काम करू शकतो.
यामुळे रस्त्यावर गर्दी ही कमी होईल. तसेच आपली सगळ्यांची वेळ ही वाचेल असं मला वाटतं. कारण या घाई गर्दीच्या वेळी रस्त्यावर रहदारी झाली तर अनेक वेळा सगळ्यांचा खोळंबा होतो. कोणालाही वेळ साधता येत नाही. आणि उशीर झाल्याने प्रत्येक जण आपली वाहने वेगात चालवतात. त्यात रहदारीचे नियम ही धाब्यावर बसवले जातात. आणि मग अपघात घडू शकतात.
या गोष्टी कमी करण्यासाठी ज्यांना बाहेरची कामे, उदाहरणार्थ खरेदी करणे किंवा कोणाकडे जायचे असल्यास किंवा जी कामे अन्यवेळी केली तरी चालण्यासारखे आहे त्यांनी शाळा, कॉलेज, ऑफीस च्या वेळा सोडून केल्यास अपघात, रहदारी सारख्या समस्या आपण कमी करू शकतो.
बघा सुरुवातीला एक आठवडा आपण हा प्रयत्न करूया आणि हो याची सुरुवात सगळ्यांनीच करूया. जर यात काही अंशी जरी यश मिळाले तर नेहमीसाठीच अशा आपण वेळा पाळूया आणि रहदारी अपघातांवर आळा घालूया.
सौ सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापक
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार