कणकवलीत लोकप्रतिनिधी, महामार्ग अधिकारी यांची बैठक…
कणकवली
मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावरून हळवल येथील तीव्र वळणावर होणारे अपघात कायमस्वरूपी थांबवण्यासाठी हे तीव्र वळण अपघातमुक्त करता येईल का ? या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी, असे निर्देश प्रभारी प्रांताधिकारी वर्षा शिंगण यांनी आज महामार्ग प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना दिले आहे.
हळवल फाटा येथे होणारे अपघात आणि त्यात होणारी जीवित हानी रोखण्यासाठी टोलमुक्त समिती, आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने नुकतेच बाळू मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी २३ फेबुवारी रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याची ग्वाही प्रांताधिकारी यांनी दिली होती. त्यानुसार आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रभारी उपविभागीय अधिकारी कणकवली वर्षा शिंगण, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरीचे श्री. जाधव, नायब तहसीलदार तथा शिरस्तेदार उपविभागीय कार्यालय कणकवली शिवाजी राठोड, उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण, श्री. शिवनिवार, अशोक कुमार, डी. जी. कुमावत, बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रामुख्याने हळवल येथील तीव्र वळणावर वारवार होणाऱ्या अपघाता बाबत प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेनुसार सध्या ज्या उपाययोजना करता येतील त्या सुचविण्यात आल्या उड्डाणपुलापासून २०० मीटरच्या अंतरावर सद्य स्थितीत वेग नियंत्रण सूचना फलक लावण्यात आले असून येथे गतिरोधक ही बसविण्यात आले आहेत. वाहनांचे वेगावर नियंत्रण आले तर येथे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल, परंतु हे अपघात थांबवता येतील का ? यावर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी निरुत्तर झाले. बाळू मेस्त्री यांच्या मागणीनुसार या तीव्र वळणाच्या कारणाने होणाऱ्या अपघाताची जबाबदारी निश्चित करावी, अशी त्यांनी लेखी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली होती. यावरही बराच काळ चर्चा झाली. परंतु तूर्तास उपाययोजना सुचवाव्यात त्यानंतर ठोस असा निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना प्रांताधिकाऱ्यांनी मांडली.
मुळात पूर्वीच्या गडनदी पुला पूलाला समांतर असे दोन्ही नवे पूल बांधण्यात आले. त्यामुळे पूर्वी प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक तीव्र वळण या भागांमध्ये आहे. परिणामी येथे अपघात होतात, जसे सर्वांचे म्हणणे होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या डिझाईनला कशा पद्धतीने परवानगी दिली. त्याची नेमकी कारण काय ? यावरही बराच काळ चर्चा झाली. त्यामुळे मूळ प्लॅन आजच्या सभेपुढे दाखवण्यात आला. त्याच प्लॅनप्रमाणेच बांधकाम विभागाने काम करून घेतले आहे. यात नव्याने बदल करण्यासाठी या सूचना आल्या आहेत. त्यानुसार नव्हे डिझाईन करावे लागेल. तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्याकडे आपण पाठवू अशी माहिती श्री. जाधव यांनी उपस्थितांना दिली.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर केंद्रीय मंत्रालय पातळीवर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू असे संदेश पारकर यानी निर्णय सांगितले. सद्यःस्थितीत महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना न करता मुक्त वळण व्हावे या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी अशा सूचना केल्यानंतर याबाबत सुरक्षा समितीचे ऑडीट करून घेणे असे निश्चित करण्यात आले. तसेच गड नदी आणि जाणवली पुलावरून जाणारे पर्यायी रस्ते जोडण्यासाठी सध्याच्या रस्त्याची रचना करण्यात आली आहे. मात्र जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर दोन्ही नद्यांवरील महामार्गाचे उड्डाण पूल पुढे १०० ते २०० मीटर वाढवावे लागेल. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा लागेल. त्या आराखड्याला मंत्र्यांनी त्यांच्या पातळीवर मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे हा मोठा प्रस्ताव आहे. त्याबाबत सर्वांनी मिळून प्रयत्न करू तूर्तास अपघात मुक्त होण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी सूचना या बैठकीत प्रांताधिकारी सौ. शिंगण यांनी मांडली, तसेच टोलमुक्ती बाबतही स्वतंत्र पातळीवर बैठक घेण्याची निश्चित करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील टोल मुक्ती बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत. राज्यभरात कशा पद्धतीने निर्णय झाले आहेत त्याची माहिती नंदन वेंगुर्लेकर यांनी बैठकीत दिली. तसेच शासनाचे आदेश आणि सध्याच्या स्थानिक पातळीवरची स्थिती लक्षात घेऊन स्थानिकांना टोल मुक्ती करता येईल यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी वेंगुर्लेकर यांनी यावेळी केली.