सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाने मानले आ. नितेश राणेंचे जाहीर आभार
कणकवली :
वारंवार अनेक प्रश्नांच्या विळख्यात सापडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे प्रश्न आ. नितेश राणे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भेट घेऊन मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे जिल्ह्यातील ठाकर समाजातील समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाने आ. नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात पडताळणी विषयासंदर्भात अन्याय होत होता. ठाकर समाज बांधव या अन्यायाला त्रासलेले होते. मात्र ठाकर समाज बांधवांनी आ. नितेश राणे यांची भेट घेऊन ठाकर समाज बांधवांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. यावेळी आ. नितेश राणे यांनी जात पडताळणी समिती उपायुक्त तथा सह आयुक्त दि. जी. पावरा यांच्याबाबत ठाकर समाज बांधमच्या असलेल्या तक्रारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे मांडल्या.
यावेळी गावित यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर कोणताही अन्याय होणारा किंवा कोणत्याही प्रकारचा अन्यायकारक निर्णय लादला जाणार नाही. तसेच जात पडताळणी समिती उपायुक्त तथा सहआयुक्त दि. जी. पावरा यांची त्वरित बदली केली जाईल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपा आ. नितेश राणे यांना दिला. यासंदर्भात आ. नितेश राणे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांसकडून वारंवार अन्याय होत होता. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील विद्यार्थी व कर्मचारी यांना अवैध ठरुन उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ येत होती. मा. उच्च न्यायालयाकडून मात्र तात्काळ सकारात्मक निर्णय होत होते. या सर्वात ठाकर समाज बांधवांची प्रचंड आर्थिक हानी होत होती. आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांनी ठाकर समाजाला दिलासा मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाने आ. नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.