प्रा.डॉ. प्रतिभा पैलवान साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित
इचलकरंजी / प्रतिनिधी
युवा कीर्तनकार ह. भ. प. श्री चैतन्य महाराज वाडेकर यांच्या पसायदान फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य साधना पुरस्कार येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रतिभा पैलवान यांना नुकताच प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रुपाली चाकणकर तसेच येरवडा तुरुंग प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य
चंद्रमणी इंदुरकर उपस्थित होते.
प्रा.डॉ. पैलवान यांनी केलेल्या सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री चैतन्य महाराज वाडेकर यांची कन्या कुमारी गाथा हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन भामचंद्र नगर, ( ता.खेड,जि.पुणे )
येथे करण्यात आले होते. सध्या समाजामध्ये स्त्री जन्माचे स्वागत होणे ही काळाची गरज आहे. हा विचार मांडण्यासाठी या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पाच कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रा. डॉ.पैलवान यांना साहित्य साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.वारकरी संप्रदायाकडून दिला जाणारा हा एक मानाचा पुरस्कार समजला जातो. या पुरस्कारासाठी प्रा. डॉ. पैलवान यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी आजपर्यंत चार कवितासंग्रहाचे प्रकाशन केले असून आणखीही नवीन प्रोजेक्टवरती त्यांचे काम सुरू आहे. तसेच त्यांनी तृतीयपंथीयांसाठी केलेल्या कार्याची दखल समाजातील सर्व स्तरावरती घेतली जात आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे. समाजामध्ये समाजासाठी लढण्यासाठी समाजाचा पाठिंबा असणं गरजेचं असतं आणि तो डॉ. पैलवान यांना मिळत आहे, हीच त्यांच्या कार्याची पोच पावती आहे. मानाचे शिल्ड, प्रमाणपत्र ,शाल ,श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.