कुडाळमधील व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..
कुडाळ :
आज कुडाळ एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल या कंपन्यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा पार पडला. या रॊजगार मेळाव्याचे उद्घाटन कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले की, कुडाळ एमआयडीसीमध्ये रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची आवश्यकता असून आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनही येथील स्थानिक तरुण-तरुणांना संधी मिळाली आहे. कुडाळ एमआयडीसीत काही ठिकाणी रॊजगार उपलब्ध असले तरी काही बंद आहेत. मात्र, व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युअर्ड क्रेडेशिअल यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा स्थानिकांना फायदेशीर आहे.
या रोजगार मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून १२०० युवक-युवतींनी हजेरी लावली. यातील १४५ जणांना ऑन दी स्पॉट ‘जॉब लेटर’ देण्यात आले. या मेळाव्यात वायोसिम एन्टरप्राइजेस, व्हीआर सन्स इंजिनिअरिंग, वेदांत टेक्नो, व्हरेनियम क्लाउड, स्पार्कप्लस टेक्नो, सिक्युअर्ड क्रेडेशिअल, साईशक्ती ऑटो, क्वेस कॉर्प, पेटीम, ओम गणेश इलेक्ट्रिक, मोरया फॅब्रिकेशन, काँनबॅक, जैतापकर ऑटोमोबाइल्स, एचडीएफसी लाईफ, ग्रीन मॅप ऍग्रो, ग्लेनमार्क फार्मा, युरेका फोर्ब्ज, डिस्टील एजुकेशन, भगीरथ एन्टरप्राइजेस, एअरटेल, अभिनव इन्स्टिटयूट आदी कंपन्यांनी सहभाग घेतला.
रोजगार मेळाव्याबरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी ग्वाही कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी दिली. व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी मॉडेल करिअरच्या माध्यमातून स्थानिक युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. तर कंपनीकडून नुकत्याच झालेल्या सावंतवाडी येथील रोजगार मेळाव्यात सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाला आहे. तरुणांना काम देणे हा एकमेव उद्देश कंपनीचा असल्याचे हर्षवर्धन साबळे यांनी सांगितले.
दर महिन्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार मेळावे भरविण्याचा आमचा मानस आहे. यामुळे स्थानिक स्तरावर नोकऱ्या उपलब्ध होतील. सिंधुदुर्गातील मुलांमध्ये टॅलेंट असून त्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही सावंतवाडीत पहिले सिंधुदुर्गातील बीपीओ सेंटर सुरु करण्यात आले. त्यावेळी प्रथम ५ मुलांना संधी देण्यात आली होती. आता बीपीओमध्ये ३० मुलांना संधी मिळाली आहे. कंपनी लवकरच कुडाळमध्ये सुद्धा बीपीओ सेंटर सुरु करण्याच्या विचारात असल्याचे राहुल बेलवलकर यांनी स्पष्ट केले.
या रोजगार मेळाव्यातून ‘ऑन दी स्पॉट’ जॉब देण्यात येत असून आतापर्यंत १७० ते १८० जणांना यातून रोजगार मिळाला आहे. तर पुढे यातून ४०० ते ४५० जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये असलेले टॅलेंटला वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात मुंबईतून अनेक कंपन्या सिंधुदुर्गात येणार असल्याने आम्ही टाकलेले पाऊल योग्य असल्याचे अमित साटम यांनी सांगितले.
यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे, व्हॅरेनियमचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर मुकुंदन राघवन, सिक्युअर्ड क्रेडेशिअलचे राहुल बेलवलकर, अमित साटम, प्रोजेक्ट हेड विनायक जाधव आणि ऍडमिन संदीप नाटलेकर, सतीश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.