You are currently viewing कुणकेश्वर यात्रेच्या पवित्र तीर्थस्थानाची सांगता

कुणकेश्वर यात्रेच्या पवित्र तीर्थस्थानाची सांगता

देवगड :

 

कुणकेश्वर यात्रेची देवस्वाऱ्यांच्या व भाविकांच्या पवित्र तिर्थस्नानाने सांगता झाली. गेले तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती. शनिवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिसऱ्या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली. यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता. कुणकेश्वर भेटीसाठी जिल्ह्यातून श्रीदेव लिंगेश्वर पावणाई असरोंडी मालवण, श्रीजयंती देवी पळसंब, श्री देव रवळनाथ वायंगणी या तीन देवस्वाऱ्या आल्या होत्या. या देवस्वाऱ्यांनी सोमवारी पहाटेपासुन समुद्रात तीर्थस्नानाला जाण्यास सुरूवात केली. देवस्वाऱ्यांबरोबरच तिर्थस्नान करण्यासाठी लाखों भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.

पहाटे तीन वाजल्यापासुन समुद्रकिनाऱ्यावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवस्वाऱ्या व भाविकांच्या तीर्थस्नानावेळी समुद्रकिनारी सुरक्षा ठेवण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस, स्वयंसेवक समुद्रकिनारी सज्ज होते. तीर्थस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मंदीर व्यवस्थापन व प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात आली होती. देवस्वाऱ्यांनी तीर्थस्नान करून व देवदर्शन घेवुन परतीचा प्रवास केला. सोमवारी सायंकाळपर्यंत भाविकांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले तर कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली.

कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेली व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. यात्रा शांततेमध्ये सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवक काम करत होते. यावर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केल्याबद्दल तसेच यात्रेचे चांगल्या पध्दतीने नियोजन केल्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेबाबत तसेच देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा