You are currently viewing भारताने दुसरी कसोटी सहा गडी राखून जिंकली; मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी

भारताने दुसरी कसोटी सहा गडी राखून जिंकली; मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांवर गारद झाला आणि भारतासमोर ११५ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने तिसर्‍याच दिवशी चार विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

मर्फीच्या चेंडूवर चौकार मारून चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पुजारा ३१ धावांवर नाबाद राहिला आणि भरतने नाबाद २३ धावा केल्या. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या विजयासह भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. आता भारताला उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजयाची गरज असून टीम इंडिया जूनमध्ये सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी विजेतेपदाची अंतिम फेरी खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि नागपूरपेक्षा सरस खेळ केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून फलंदाजी करत २६३ धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या गाठता आली. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

भारतीय संघाने अत्यंत खराब सुरुवात केली आणि पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याचे दिसत होते, मात्र अश्विन-अक्षरने शतकी भागीदारी करत भारताला सामन्यात परत आणले. दोघांनी आठव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. अखेर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या एका धावेची आघाडी मिळाली. भारताकडून अक्षरने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर विराट कोहली आणि अश्विननेही उपयुक्त खेळी खेळल्या. ऑस्ट्रेलियाकडून लिऑनने पाच विकेट घेतल्या. मर्फी-कुहमन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात केली आणि एका टप्प्यावर ६५ धावांवर एक विकेट गमावून चांगली स्थिती असल्याचे दिसत होते, परंतु तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ ११३ धावांवर गडगडला. रवींद्र जडेजाने कुहनमनला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. तो त्रिफळाचीत झाला. या डावात जडेजाने सात तर अश्विनने तीन बळी घेतले. सामन्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे तिसर्‍या दिवशीच लागला.

पहिल्या डावातील एका धावेच्या आघाडीच्या जोरावर भारतासमोर कसेबसे ११५ धावांचे लक्ष्य होते, जे टीम इंडियाने चार गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने अवघड खेळपट्टीवर सावध फलंदाजी न करता मोठे फटके खेळण्याची संधी सोडली नाही. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पुढचा सामना जिंकताच भारतीय संघ जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.

*सामन्यात महत्वाचे मुद्दे:-*

पहिल्या डावात उस्मान ख्वाजाने ८१ धावा तर पीटर हँड्सकॉम्बने नाबाद ७२ धावा काढल्या. तर भारताकडून अक्षर पटेलने ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अन्यथा भारत मोठ्ठया धावसंख्येने पिछाडीवर गेला असता. अक्षरने तिसर्‍यांदा अर्धशतक केले त्यापैकी दोनदा नाबाद राहिला.

दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने ४३ तर मार्नस लॅबुशेनने ३५ यांच्या व्यतिरिक्त कोणीही दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. तर भारताकडून रोहित शर्मा ३१, पुजारा नाबाद ३१, श्रीकर भरत नाबाद २३ आणि विराट कोहली २० यांनी धावा जमवल्या.

पुजाराचा हा १००वा सामना होता. सामना सुरू होण्याआधी सुनील गावस्कर यांनी त्याला भारतीय संघाच्या कसोटी टोपीसह शुभेच्छा दिल्या.

रवींद्र जडेजाने दुसर्‍याांदा एकाच सामन्यात १० गडी बाद केले. तर अश्विनने ही कामगिरी ७ वेळा केली आहे.

रवींद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने पहिल्या ३ तर दुसर्‍या डावात ७ गडी बाद करत सामन्यात १० बळी आपल्या नावावर नोंदवले तर पहिल्या डावात फलंदाजी करताना बहुमूल्य अशा २६ धावा काढल्या होत्या.

भारतात सलग दुसरा कसोटी सामना तिसर्‍या दिवशी संपला आहे, ह्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड काय कारवाई करते हे महत्वाचं ठरणार आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =