You are currently viewing चेंबूरच्या आचार्य व मराठे महाविद्यालयात भरणार मराठी साहित्य संमेलन २०२३

चेंबूरच्या आचार्य व मराठे महाविद्यालयात भरणार मराठी साहित्य संमेलन २०२३

*मराठी साहित्य रसिक मंडळ, चेंबूर यांचा पुढाकार*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मराठी साहित्य रसिक मंडळ, चेंबूर आणि श्री. ना. ग. आचार्य व श्री. दा. कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी साहित्य संमेलन २०२३” चे आयोजन २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी श्री. ना. ग. आचार्य व श्री. दा. कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर येथे करण्यात येत आहे.

मराठी भाषेतील नामवंत कवी, लेखक, कलाकार, वक्ते यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद, त्यांचा सहवास, चर्चा, संवाद, साहित्य, कला व संस्कृती यांच्या वेगळ्या अनुभूतीने समृद्ध व्हावे, या संकल्पनेतून साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे रसिकांनी ही कल्पना उचलून धरली आहे. गेली दोन वर्षे ‘कोविडच्या भीषण संकटाला आपण सगळेच धैर्याने सामोरे गेलो आहोत आणि आता नव्या उमेदीने पुन्हा एकदा “साहित्य संमेलनाचे” आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी रससुधा या कार्यक्रमात नवरसांचा आस्वाद देणाऱ्या कविता व गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आचार्य व मराठे महाविद्यालय यांच्यावतीने ‘कलारंग’ या कार्यक्रमात अनोख्या साभिनय सादरीकरणाने सादर केले जाणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध कविवर्य अशोक नायगावकर यांच्या “पंचाहत्तरी” निमित्त सत्कार व नंतर “नायगावकरी” हा कविता व किस्स्यांचा रंगतदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी “कंबोडिया, कोणे एके काळी” हा भारतीय संस्कृतीशी नाते सांगणारा, “कंबोडिया” या देशातील प्राचीन मंदिरातून सजलेला भारताबाहेरील भारत यावर रंजक “स्लाईड शो” डॉ. उन्मेष करमकर, पुणे सादर करणार आहेत. यानंतर प्रसिद्ध कवी रमेश तांबे यांचा मराठी म्हणी, वाक्प्रचार’ वगैरेंची जन्मकथा सांगणारा रंजक कार्यक्रम “जन्म म्हणींचा” होणार आहे. तर संमेलनाची सांगता “नाटक”: “थिएटर” मधले आणि “होम थिएटर” मधले यात दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्ये दिग्दर्शक, नट म्हणून गाजलेले मंगेश कदम व दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रसन्न व्यक्तिमत्वाची अभिनेत्री श्रीमती लीना भागवत यांची दिलखुलास मुलाखत दूरदर्शन अभिनेत्री श्रीमती शीतल कुलकर्णी घेणार आहेत.

आचार्य व मराठे महाविद्यालय तसेच मराठी साहित्य रसिक मंडळ, चेंबूर यांच्यावतीने सर्व मराठी साहित्यप्रेमींना सादर निमंत्रित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा