मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
अभ्युदय नगर काळाचौकी येथे महाशिवरात्रीचा योग साधत आर. के. फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष राम कदम आणि सचिव सुप्रिया कदम यांच्या वतीने गरीब आणि गरजूंसाठी संपुर्ण परिसरात प्रत्येक जेष्ठ नागरिकांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. “थोडंसं आपल्या लोकांसाठी” ह्या सामाजिक भावनेतून सदर उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन यावेळी राम कदम यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी मराठी हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम ज्येष्ठ गायक अशोक सावंत आणि हरहुन्नरी बालगायिका वेदश्री विनायक जाधव यांनी सादर केला. त्यांच्या सुमधूर गाण्यांवर सभागृहात उपस्थित ज्येष्ठ नागरिक दाद देत होते आणि कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.
सदर कार्यक्रमासाठी एलआयसी दादर शाखेचे स्वरूप दवणकर, जिजामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रदीप आहिर, सचिव सोनू भालेकर, माझगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे एकनाथ पवार, समाजसेवक महेश सुर्वे, वेलनेस डायग्नोसिस अॅण्ड पॉलिक्लिनिकच्या मनाली लांजेकर आणि श्रृती केळुसकर उपस्थित होते.
एलआयसीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती स्वरूप दवणकर यांनी विस्तृतपणे सादर केली. त्यासोबतच सदर योजनांचे परिपत्र सर्व ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले. वेलनेसच्या मनाली लांजेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्प दरांमध्ये सर्व पॅथॉलॉजी चाचण्या करून देणार असल्याचे आवर्जून सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी आर. के. फाउंडेशनच्या कार्यालयात सर्व चाचण्यांकरता नमूने घेण्यासाठी त्या उपलब्ध असणार आहेत. जे रूग्ण बिछान्यातच असतील त्यांच्या घरी जाऊन त्या नमूने गोळा करणार आहेत.
सर्व ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय शिस्तबद्घ पद्घतीने हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यामुळे नियोजित वेळेत पार पाडण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्नेहा साळवी, भाग्यश्री आडविलकर, सीताबाई कदम, बाळू अंकुश घुगे, आदित्य कदम यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.