*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*
*वेड इतिहासाचे*
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता:
शाहसुनो: शिवसैषा: मुद्रा भद्राय राजते
काय? माहिती आहे ना? राजमुद्रा आहे, आपल्या अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची. तर ही संस्कृत भाषेत लिखित असून याचा अर्थ काहीना नक्कीच माहिती असेल किंवा काहीना नसेल माहिती. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी नमूद करतो. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि अवघ्या विश्वात वंदनीय होतो अगदी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा वाढत जाईल आणि विश्वात वंदनीय ठरेल. तसेच आज घडत आहे माझ्या राजांची आपल्या राजांची महती, मुद्रा नक्कीच त्रिखंडात वाढत आहे. बरोबर ना. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा ओळख झाली ती इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून. अहो, त्या पुस्तकाचा सुरुवातीचा भाग सोडला तर संपूर्ण शिवचरित्र त्या पुस्तकांच्या पानांवर रेखाटले होते असे म्हणायला ही वावगे ठरणार नाही. आणि तिथून पुढे जी सुरुवात झाली राजांच्या चरित्रात्मक अभ्यासाला ती आजपर्यंत किंबहुना आजही अविरतपणे चालू आहे. तुम्ही म्हणाल चौथीच्या अभ्यासक्रमाला आता बरीच वर्षे झाली तरी अजूनही इतिहास कळला नाही? अहो, राजांचा इतिहास, प्रसंग, त्यातील बारकावे इतके मोठे आहे की कितीही वाचले, कितीही ऐकले तरी मनाचे समाधान मात्र काही केल्या होत नाही. राजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक क्षण हा स्वतः जगावसा वाटतो. त्या प्रत्येक प्रसंगातून काहीनाकाही बोध घेण्यासारखे आहे. परंतु इयत्ता चौथीत असताना इतिहास विषय खूप अवघड वाटायचा पण जसजसा इतिहास वाचत गेलो, राजांची व्याख्याने ऐकत गेलो तसतसा इतिहास हवाहवासा वाटू लागला. आता हे युग सुद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, किंबहुना त्यांच्या विचारांचे आहे. तरीही कुठे तरी आपला राजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही, ही खंत व्यक्त करावीशी वाटते. कारण,
||निश्र्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी||
हे फक्त आपल्याला माहिती आहे हो, येणाऱ्या पुढच्या पिढीचे काय? कोण पोहोचवणार त्यांच्यापर्यंत हा राजांचा इतिहास? आताच्या काळात बरेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम, चरित्र अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ते किती लोक बघतात, शिवाय आपल्या मुलांना दाखवतात. आताचा सर्व नवतंत्रज्ञानाचा जमाना आहे, त्यामुळे लहान मुलांना 2D ॲनिमेशन, 3D, 4D, MAX HD, 4DMAX, 3D MAX अशा स्वरूपातील कार्टूनचे सिनेमे बघायचे असतात. आपल्या लहान मुलांना अमेरिकेतील स्पायडर मॅन, आयरन मॅन, सुपर मॅन, हल्क, यासारखे व्यक्ती हिरो वाटतात, किंवा सिनेमा इंडस्ट्री मधील शाहरुख खान, सलमान खान, कार्तिक आर्यन, दीपिका पादुकोण, कॅटरीना यासारखे व्यक्ती हिरो वाटतात. एवढेच नाही जर त्यांना विचारलं ना तुमचा आवडता आयडॉल कोण आहे? तर यातीलच नावे समोर येतात. या सगळ्यात आपल्या महाराष्ट्रातील संत, महापुरुष, यांचे नावे पुढे येताना दिसत नाही. मुलांना तो गॅजेट्स देणारा डोरीमोन त्यांचा हिरो वाटतो पण ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळून दिलं, ज्यांनी स्वराज्याचे अधिकार समस्त जनतेला देऊ केलेत ते तर आढळत नाही या सगळ्यात. आजकालच्या जमान्यात तर लहान मुलांना गोष्टी, कहाणी सांगण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत तर बंदच पडली आहे जणू. शिवाय मुलांना जन्मल्यापासून फोन हातात घेण्याची सवय झाली आहे. पण ते त्यावर बघणार काय? तर हेच कार्टून्स, आणि ॲनिमेशन. पण त्या मुलांना एखादी शिवरायांच्या जीवनातील घटना वा प्रसंग, त्यातील कथा हे दाखवण्याची तसदी तर कोणीच घेत नाही. मग याही पलीकडे मुले मनोरंजन साठी गेम्स खेळत बसतात अगदी तासनतास. मग या ठिकाणी चूक कोणाची? आपलीच. होय. आपलीच.
आज आपली मुलं गेम्स, आणि इंटरनेट वरील, यू ट्यूब वरील अनावश्यक व्हिडिओज बघत असतात या अवस्थेला सर्वतोपरी आपणच जबाबदार आहोत. त्या इवल्याशा पोरांना काय कळत हो जे समोरील येईल किंवा ज्या गोष्टी त्यांना बघण्यास प्रेरित करतात, उत्स्फूर्त करतात, ज्यात त्यांना बघण्यास अधिक रस वाटतो ते ते बघणारच. पण मुलांना काय उपयोगी काय निरुपयोगी हे सांगायचे, दाखवायचे काम आपले आहे. आपण आपल्या व्यस्त कामातून आपल्या मुलांसाठी तासभर वेळ काढला आणि ऐतिहासिक चार गोष्टी ऐकवल्या, छत्रपतींच्या जीवनावरील काही प्रसंग सांगितले तर नक्कीच त्यांच्यात एक उर्मी भरेल, आत्मबळ मिळेल, त्यांच्यात नवचैतन्य उभारेल, काहीतरी नवीन गोष्टी करण्यास प्रेरित होतील.
मध्यंतरी एक व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात आला एक पाच वर्षाची मुलगी ढोल पथकात सामील होऊन शिवस्तुती म्हणत होती. ते बघून इतके हायसे वाटले, आणि उर भरून आला, तसेच मनाचे ही समाधान झाले की नवीन पिढी काहीतरी करु पाहत आहे. शिवविचार पुढे घेऊन जाण्यास धजत आहे. तेव्हा आपल्याही मुलांनी असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याने आपल्याला आपल्या मुलांचा, अभिमान वाटेल. मी तर म्हणतो येणाऱ्या नवीन पिढीतील प्रत्येक मुलाचे व मुलीचे शिवस्तुती आणि शिव गर्जना तोंडपाठ असायला हवे. शिवाय राजमुद्रा ही माहित असावी. तेव्हा समस्त मुलांच्या पालकांना विनंती आहे की, आपल्या मुलांसाठी दिवसातून एक तास तरी थोडा वेळ काढा, ऐतिहासिक गोष्टी ऐकवा, कारण ऐतिहासिक सिनेमे, नाटक, महाराष्ट्रातील गड, किल्ले बघण्याची गोडी आपण स्वतःहुन त्यांच्यात निर्माण करण्याचे आणि महाराष्ट्राचा इतिहास पिढ्यानपिढ्या मुलांमध्ये रुजविण्याचे काम आपले आहे.
याला कारण ही तसेच आहे,
“झाले बहु, होतील बहु, आहेतही, बहु परंतु यासम हा”
म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांची तुलना करणे अशक्य आहे. असे व्यक्तिमत्व आजपर्यंत कधी घडले नाही, घडत नाही, आणि यापुढे ही घडणार नाही. आपण तर कधी शिवाजी होऊ शकलो नाही, कोण होते शिवाजी? तर ६५ किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी लढा देत राहतो त्याचं नाव तान्हाजी, आठ तासांत घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ढाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभं फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेतो स्वराज्याच तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. हे सांगून त्याचबरोबर शरीराने नाही तर मनाने व्हायचं आहे शिवाजी हे सांगून नक्कीच उद्याचा शिवाजी घडवू शकतो. व तेव्हाच खऱ्या अर्थाने म्हणू शकतो,
“शिवराय आमच्या मनामनात, शिवजयंती घराघरात.”
लेखक : नयन धारणकर, नाशिक
8275838083.