देवगड :
उद्या पासून दक्षिण कोकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रौत्सवास सुरूवात होत आहे. कुणकेश्वर यात्रेत पुन्हा भक्तिचा मळा फुलणार आहे. यावर्षी यात्रेचा कालावधी तीन दिवस असुन यात्रा कालावधीत देवदर्शन व तिर्थस्थानाकरिता भाविकांचा महासागर उसळणार आहे.यात्रा कालावधीत श्रीदेव कुणकेश्वराचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे. कुणकेश्वर भेटीसाठी श्रीदेव लिंगेश्वर पावणाई असरोंडी मालवण, श्रीजयंती देवी पळसंब, श्री देव रवळनाथ वायंगणी या तीन देवस्वाऱ्या तिर्थस्नानास येणार आहेत. भजन मंडळे यावर्षी यात्राकालावधीत भजन सादर करणार आहेत.
दोन दिवसांचा यात्रा कालावधी असल्याने सोमवारी पहाटेपासुन समुद्रकिनाऱ्यावर धार्मिक विधी, देवस्वाऱ्यांचे व भाविकांच्या तिर्थस्नानाला सुरूवात होईल. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना दर्शन घेणे, मंदीर परिसर व समुद्रकिनारी जाणे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याचे नियोजन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे. भाविकांसाठी पाणपोई व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. कोरोना नियमावलीनुसार यात्रा कालावधीत रस्त्याच्या दुतर्फा तसेच समुद्रकिनाऱ्यावर विविध दुकानांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत यांच्यावतीने प्रत्येक व्यापाऱ्यांना दुकानाच्या सीमा ठरवून देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल देखील याठिकाणी उभारले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकानेयांनी यात्रा परिसर फुलुन गेला आहे. या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेती अवजारे मोठ्या विक्रीस आली आहेत. तसेच कुणकेश्वरच्या समुद्रकिनारही हॉटेल्स व दुकाने यामुळे समुद्रकिनारी दुकानाने भरून गेलेला दिसून येत आहे.
आरोग्य विभागामार्फत १२३ कर्मचारीवर्ग तैनात करण्यात आलेत. २४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी दोन पथके कुणकेश्वर प्राथमिक शाळा, भक्तनिवास कार्यरत राहणार आहेत. कुणकेश्वर यात्रा कालावधीत वीजप्रवाह सुरळीत राहण्यासाठी वीज वितरणची टीम तैनात करण्यात आली आहे.जामसंडे सबस्टेशन, तळेबाजार सबस्टेशन येथून दोन फीडरवरून वीजप्रवाह सुरळीत ठेवण्यात येणार आहे.वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता १, शाखा अभियंता ७ व दोन शिफ्टमध्ये ३० कर्मचारी तैनात आहेत. यात्रेसाठी देवगड व विजयदूर्ग आगारातून एकूण ३१ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवगड एसटी आगारातुन एकूण २६ यामध्ये देवगड जामसंडे मधून १५ व शिरगाव १, तळेबाजार १, रेंबवली १, चाफेड १, वळीवंडे १, मोंडतर १, इळयेसडा १, तेलीवाडी १ अशा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतुक ही पुलावरून होणार असल्याने वाहतुक कोंडी कमी प्रमाणात होईल. तीन ठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तारामुंबरी मिठमुंबरी पुल मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलनजिक, कणकवली येथून लिंगडाळमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल शिवसागरसमोर, आचरा मिठबांव मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी एमटीडीसीसमोर वाळूवर पार्कीग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रोत्सवाकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून उपविभागीय पोलिस अधिकारी १, पोलिस निरिक्षक ६, स.पो.निरिक्षक ६, पोलिस निरिक्षक १० असे एकूण २३ पोलिस अधिकारी आणि पुरूष व महिला पोलिस कर्मचारी १३० एकूण १५३ पोलिस अधिकारी कर्मचारी याबरोबर १०८ होमगार्ड, आरसीपी जवान यांची ३० जणांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.