You are currently viewing महावितरणच्या दुर्लक्षामुळे मडूरेत शॉर्टसर्किटमुळे बागायतीला आग

महावितरणच्या दुर्लक्षामुळे मडूरेत शॉर्टसर्किटमुळे बागायतीला आग

बांदा

महावितरण अधिकार्‍यांच्या गलथानपणाचा फटका शेतकर्‍यांना बर्‍याच वेळा सहन करावा लागतो. असाच प्रकार मडुरा डीगवाडी येथे घडला आहे. शॉर्टसर्किटमुळे ठिणगी उडून शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या आंबा व काजू बागायतीला आज दुपारी आग लागली. मात्र, वालावलकर कुटुंबियांच्या अथक प्रयत्नांमुळे आग तातडीने विझविण्यात यश आले. महावितरण अधिकार्‍यांच्या कामचुकारपणा बद्दल प्रकाश वालावलकर यांनी संताप व्यक्त केला.

मडुरा डीगवाडी येथील वीज खांबावर दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे आग लागते. याबाबत वायरमन व लाईनमन यांना योग्य ती काळजी घेण्याची विनंती वालावलकर यांनी वारंवार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज दुपारी आग लागली. त्याचवेळी बांद्याहून येणाऱ्या संदिप परब यांना धुर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आग लागल्याची माहिती वालावलकर यांना फोनवरुन देऊन आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रकाश वालावलकर, उत्तम वालावलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. अन्यथा काजू व आंबा बागायती जळून खाक झाली असती.

महावितरण अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाबद्दल वालावलकर यांनी संताप व्यक्त केला. वारंवार विनंती करुनही योग्य ती काळजी घेण्यात न आल्याचे त्यांनी सांगितले. महसूल व पोलीस प्रशासनालाही त्यांनी आगीची माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा