You are currently viewing धामापूर, काळसे रस्त्यावर गतिरोधक घाला; दोन्ही गावच्या सरपंचांचे सबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना निवेदन

धामापूर, काळसे रस्त्यावर गतिरोधक घाला; दोन्ही गावच्या सरपंचांचे सबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना निवेदन

मालवण

मालवण – चौके – नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावर काळसे आणि धामापूर हद्दीतील रस्त्यावर तातडीने गतिरोधक घालावेत या मागणीचे निवेदन धामापूर सरपंच सौ. मानसी परब आणि काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर यांनी बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग , जिल्हा पोलीस अधिक्षक , प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग , आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली , यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि भरधाव अवजड वाहनांमुळे काळसे धामापूर हद्दीत वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी काळसे हद्दीत १० आणि धामापूर हद्दीत ६ ठिकाणी गतीरोधक घालण्याची मागणी केली. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे या मार्गावरून चिरे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित कसून तपासणी करावी अशी मागणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत माजी सभापती राजेंद्र परब , धामापूर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे , काळसे हायस्कूल संस्था उपाध्यक्ष योगेश राऊळ , कमलाकर आजगावकर, प्रताप चव्हाण महेश परब आणि सहकारी उपस्थित होते.
काळसे होबळीचा माळ येथे नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात मद्यधुंद चालकाने भरधाव डंपर चालवून रस्त्याकडेने चालणाऱ्या रमाईनगर येथील पाच कष्टकरी महिलांना बेदरकारपणे उडवले होते त्यात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर चार महिला जखमी झाल्या या घटनेमुळे काळसे रमाईनगर ग्रामस्थांनी आक्रमक होत गतिरोधक घालण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.
संपूर्ण जिल्ह्याला हादरवणाऱ्या या अपघातानंतर काळसे आणि धामापूर या दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मालवण – चौके- नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावरून वाळू , चिरे वाहतूक करणारे शेकडो अवजड डंपर तसेच गोवा येथून पर्यटकांना मालवण येथे घेऊन जाणाऱ्या टेंपो ट्रॅव्हलर या सर्वांचा वेग छातीत धडकी भरवणारा असतो. धामापूर भगवती मंदिर ते नेरुरपार पुल या दरम्यान बहुतांश लोकवस्ती ही रस्त्याकडेलाच असून प्राथमिक शाळा , हायस्कूल , ग्रामपंचायत , बॅंक आणि इतर कार्यालयेही रस्त्यालगतच आहेत, त्यामुळे या मार्गावर लहान मुले , शालेय विद्यार्थी , शेतकरी आणि ग्रामस्थ यांची नेहमी वर्दळ सुरू असते. असे असूनही चिरे वाळु वाहतूक करणारे शेकडो अवजड ट्रक आणि डंपर या मार्गावरून कोणतीही वेगमर्यादा न पाळता ये जा करत असतात. तसेच ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला साइडपट्टीही नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. यासाठी धामापूर आणि काळसे हद्दीतील मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी गतीरोधक व्हावेत अशी मागणी यापूर्वीही अनेकदा ग्रामस्थांनी केली होती. कारण यापूर्वीही अनेकदा या परीसरात चालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात झाले आहेत त्यामध्ये दोन वेळा डंपरनी विद्युत पोल तोडले होते , पर्यटकांना घेऊन जाणारा टेंपो ट्रॅव्हलर धामापूर येथे अंगणात कोसळला होता , नेरुरपार पुलानजीक चिरे वाहतूक करणारा डंपर शेतात कोसळला होता आणि १५ दिवसांपूर्वीच काळसे सातेरी मंदिर नजीक एका डंपरने रस्त्याकडेने चालणाऱ्या व्यक्तीस मागून उडवून जायबंदी केले होते, असे अनेक अपघात या परीसरात वारंवार होत असतात आणि विशेष म्हणजे सर्व अपघात हे भरधाव गती आणि चालकांचे अनियंत्रित चालवणे यामुळेच होतात. त्यातील बहुतांश चालक हे मद्यपान करून असतात. यावर आळा घालणे हे अत्यंत गरजेचे होते म्हणूनच आताच्या भीषण अपघातानंतर काळसे, धामापूर ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे दोन्ही गावच्या हद्दीतील रस्त्यावर तातडीने गतिरोधक घालण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी केली. त्यानुसार काळसे धामापूर गावच्या सरपंचांनी तातडीने ॲक्शन घेत ग्रामपंचायतीच्या वतीने वरील सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देउन तातडीने गतिरोधक घालून देण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा