You are currently viewing दांडेली खोतवाडी-धनगरवाडी नळपाणी योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

दांडेली खोतवाडी-धनगरवाडी नळपाणी योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

माजी सरपंच संजू पांगम : ग्रामस्थांची पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी

बांदा

शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून दांडेली खोतवाडी व धनगरवाडीसाठी उभारण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र राहिलेले काम पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शिल्लक राहिले. सद्यस्थितीत ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यात सदर योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित न झाल्याने आम्ही दाद कोणाकडे मागायची असा खडा सवाल दांडेली माजी सरपंच संजू पांगम यांनी प्रशासनास केला आहे.
दांडेली खोतवाडी व धनगरवाडीसाठी
सन 2019-20 सालामध्ये शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळपाणी योजना मंजूर झाली होती. मार्च 2020 मध्ये सदर कामालाही प्रत्यक्ष सुरुवात झाली. यावेळी दांडेली खोतवाडी व धनगरवाडी ग्रामस्थांमध्ये आपल्या चाळीस वर्षाच्या मागणीला यश आल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. योजनेसाठी जागेचे बक्षीस पत्र करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी खोत यांनी पुढाकार घेतला होता. तसेच ही योजना मंजूर होण्यासाठी माजी सरपंच चित्रा गोडकर, स्मिता मोरजकर, संजय पांगम, माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी प्रयत्न केले. त्यानंतर कोरोनाचा काळ व एका ग्रामस्थांची असलेली तक्रार यामुळे सदर योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागल्याचे संजू पांगम यांनी सांगितले.
सद्यस्थितीत सदर योजनेचे काम हे 90 ते 95 टक्के पूर्ण झालेले आहे. मात्र राहिलेलं काम ठेकेदार व पाणीपुरवठा विभाग सावंतवाडी यांच्या दुर्लक्षामुळे पूर्ण झालेले नाही. सदरची योजना ही ग्रामपंचायतकडे हस्तांतरित न झाल्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा याकडे लक्ष देत नाही. सद्यस्थितीत धनगरवाडी व कोंडूरा तिठा या परिसरात पाणीटंचाई सुरू झाली आहे. मात्र योजनेच्या पाण्यासाठी दाद कुठे मागावी हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. सदर नळपाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करून ग्रामस्थांची पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी संजू पांगम यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा विभागाचे श्री. राणे यांच्याशी संपर्क साधला असता येत्या महिनाभरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 16 =