*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी आबासाहेब घावटे लिखित अप्रतिम कथा*
*छोटूराम*
पाथरी नावाचं एक गाव होतं. त्या गावात छोटूराम नावाचा एक गुराखी रहात होता. गुरांचा मोठ्ठा कळप घेऊन तो रोज रानात जायचा. मोकळ्या माळावर गुरं चरायला सोडायची. मित्रांबरोबर खेळत बसायचं. गोट्या, विटीदांडू, सुरपारंब्या असे अनेक खेळ चालायचे. दुपारी सगळेजण मिळून जेवायचे. गुरंही झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायची. पुन्हा चरायला जायची. संध्याकाळ झाली की निघाले सगळे गावाकडे.
छोटूराम हा त्याच्या आईसोबत एका झोपडीत रहायचा. आईनं त्याचं नाव केशव ठेवलेलं. पण तो खूप बुटका होता. त्यामुळे सारे त्याला छोटूराम म्हणायचे. तो फार उनाड होता. तसाच धाडसीही होता. चपळ होता, मोठा चतुरही होता. तो एका जागेवर कधी शांत बसत नसे. दिवसभर रानातही त्याचे उद्योग चाललेलेच. बैलांच्या टकरी लावायचा. वासरं सार्या रानात पळवायची. म्हशीवर बसून त्या उधळायच्या. हा त्याचा आवडता उद्योग.
उन्हाळ्याचे दिवस होते. म्हशींना ऊन सहन होत नव्हतं. त्यामुळं त्या दुपारी नदीकडं पळायच्या. नदी माळाच्या पलीकडं होती. शिवाय तिला पाणीही भरपूर, म्हशी धावत जाऊन थेट पाण्यात शिरायच्या. पोटभरून पाणी प्यायच्या आणि खुशाल पाण्यात पोहायच्या. म्हशी नदीकडं गेल्या की उरलेली गुरं घेऊन गुराखी नदीवर यायचे. पाणी पिऊन गुरं तिथच सावलीत विश्रांती घ्यायची. गुरं विसावली की गुराखी पाण्यात उतरायचे. खूप पोहायचे. छोटूरामकडं चंद्री नावाची म्हैस होती. तो एक दावं घ्यायचा. त्या म्हशीला बांधायचा. तिच्या पाठीवर बसायचा. नदीच्या खोल पाण्यातून तिला या कडेवरून त्या कडेला घेऊन जायचा. सुरुवातीला म्हैस ना नू करायची. पण त्यानं फोक हातात घेतला की माराच्या भीतीनं ती पोहू लागायची. तिच्या पाठीवर बसून तो रोज नदीच्या या काठावरून त्या काठावर जायचा.
एके दिवशी गावात एक व्यापारी आला दोन-तीन दिवस राहून त्याने त्याच्या जवळच्या वस्तू विकल्या. तो पुढच्या गावाला निघाला. वाटेत नदी होती. नदीला खूप पाणी होते. नदीतून ये-जा करायला होड्यांची सोय नव्हती. पलीकडं कसं जायचं? नदी कशी ओलांडायची? व्यापारी विचार करू लागला.
सकाळची वेळ होती. गावातल्या देवळासमोर माणसांची गर्दी जमली होती. छोटूराम घराकडं निघाला होता. एवढी माणसं का जमली हे पाहण्यासाठी तो तिकडं गेला. व्यापारी गावकर्यांना विचारत होता. सांगा कोण तयार आहे मला नदीपलीकडे नेऊन सोडायला? जो तो एकमेकांकडं पहात होता. कुणी काही बोलेना. सगळे शांतपणे उभे होते. थोडा वेळ थांबून व्यापारी म्हणाला, “जो कोणी मला माझ्या सामानासह नदीपलीकडे नेऊन सोडेन, त्याला मी दहा सोन्याच्या मोहरा बक्षीस देईन”
व्यापारी पुन्हा पुन्हा विचारत होता. पण कुणीही उत्तर देत नव्हते. हे पाहून छोटूराम पुढं आला. “मी सोडतो दादा तुला नदीच्या पलीकडे” छोटूरामचे हे शब्द ऐकताच लोकांना आश्चर्य वाटलं. ते त्याच्याकडं पाहू लागले. खदाखदा हसू लागले. जे गावाला जमलं नाही ते या छोट्याला कसं जमणारं? लहान तोंडी मोठा घास घेऊन काय उपयोग? आपलं अंथरुण पाहूनच पाय पसरलेले बरे ना! असे शब्दांचे टोमणे लोक त्याला मारु लागले.
छोटूराम काहीही न बोलता शांत उभा होता. व्यापार्यानं छोटूरामकडं पाहिलं. तो आत्मविश्वासानं उभा होता. व्यापार्यानं विचार केला बघूया हा काय करतो ते? बघायला काय हरकत आहे. व्यापारी त्याचं सामान घेऊन नदीवर गेला छोटूराम घरी जाऊन म्हैस घेऊन आला. गावातले काही बघेही नदीच्या काठावर आले. छोटूरामने म्हैस आणताच ते मोठमोठ्याने हसू लागले.
छोटूरामने म्हैस पाण्यात घातली. तो तिच्या पाठीवर बसला. एका हातात तिच्या वेसणीला बांधलेले दावे व एका हातात काठी होती. व्यापार्याजवळचं सामानाचं गाठोडं घेतलं. दावं धरलेल्या हातानं ते समोर पोटाशी धरलं. म्हैस हाकारली तशी ती हळूहळू पुढं सरकू लागली. पुढं पाणी खोल होतं. त्यात शिरताच ती पोहू लागली. पोहत पोहत पुढे सरकू लागली. तिला रोजच या कडेवरून त्या कडेला जायची सवय होती. छोटूरामला घेऊन ती अलगद पलीकडच्या काठावर गेली. पलीकडे जाताच तो म्हशीवरून खाली उतरला. व्यापार्याचं गाठोडं व्यवस्थित ठेवलं व परत आला.
व्यापारी इकडच्या काठावरुन सारं दृश्य पहात होता. परत आल्यानंतर त्यानं आपल्या पाठीमागं व्यापार्यालाही म्हशीवर बसवलं. तिला पाण्यात घातलं. दोघांना घेऊन ती हळूहळू पोहू लागली. थोड्या वेळातच ती दोघं पलीकडच्या काठावर पोहचली. व्यापार्याला खूप आनंद झाला. “छोटूराम जे काम भल्याभल्यांना जमलं नाही, ते तू केलंस. खरंच तू मोठा धाडसी आहेस. धाडस, चिकाटी, सततची धडपड हेच गुण माणसाला यशाच्या शिखराकडे घेऊन जातात” म्हणत व्यापार्याने त्याला शाबासकी दिली.
व्यापारी निघून गेला. त्याने छोटूरामला दहा सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या. छोटूराम गावात परत आला. जमलेल्या गावकर्यांनी त्याचे खूप कौतुक केले. माणूस कसा आहे? हे त्याच्याकडं पाहून कधीच ठरवू नये. त्याच्या कर्तृत्वावरुन त्याची खरी ओळख होते. जीवनात आपण अनेक गोष्टी करतो. त्यातल्या अशा काही गोष्टी मात्र आपल्या आयुष्याचं सोनं करून जातात. केलेलं वाया जात नाही……
आबासाहेब घावटे
८४९/२ उपळाई रोड ,पवार प्लॉट बार्शी
मो.नं.९८९०८२९७७५