You are currently viewing पहिले नमन ,हेरंबाला

पहिले नमन ,हेरंबाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर यांनी १३ फेब्रुवारी या शेगावच्या श्री.गजानन महाराजांचा ‌प्रगट दिनानिमीत्त श्री.गजानन महाराज चरणी अर्पण केलेली “कमल पुष्पें.*

पहिले नमन ,हेरंबाला
विघ्नहर्त्या श्री गणेशाला
दुसरे नमन श्री शारदेला
लिखाणास स्फूर्ती द्यावी, या मंजिरीला

*गजानन कमल पुष्प (१२)*

ऐश्वर्य संपन्न बच्चूलालाने
भक्तीभावाने केले पूजन
दागिने,होनमोहर दक्षिणा अर्पण
पण महाराजांनी त्यजिले समर्पण.

पितांबरासाठी गुरूवर
भक्त रक्षणा धावला
आर्त प्रार्थनेस साद देत
वठला आंबा पल्लविला.

*गजानन कमल पुष्प (१३)*

सवडदचा गंगाभारती
रक्तपितीने त्रासला अती
गजानन कृपाषौधीने
मिळाली रोगातून मुक्ती.

पुंडलीकाची प्लेगची गांठ
निमाली, श्री गजानन कृपेने
गुरू भक्तीचे गोड फळ
गंडांतर टळले,निष्ठा भक्तीने.

*गजानन कमल पुष्प(१४)*

ओंकारेश्वरी नौका फुटली
भक्तांची भितीने गाळण उडाली
धारिला वेष कोळीणीचा
नर्मदे ने क्षणात नौका तारिली.

माधव नाथाची आठवण
भोजन समयी केली,श्रींनी
विडा सुपुर्द वानवळ्या हाती
कथिले, संत भेटी स्मरणाने होती.

*गजानन कमल पुष्प (१५)*

टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्याला
आशिर्वाद लाभला श्री गजाननाचा
भाकरीप्रसादे, टिळक हस्ते मोठी कामगिरी
जन्म झाला,गीतारहस्य ग्रंथाचा.

कोल्हापूरच्या श्रीधर काळ्याला
भारतीय शास्त्रांचे केले उद्बोधन
त्यायोगे श्रीधर काळ्याचे
झाले की हो, विचार परिवर्तन.

*गजानन कमल पुष्प (१६)*

भास्कर पाटलांचा दुराग्रह
“श्री” ना बसविले अग्निरथी
नग्न राहती,खटला भरला
दंड भरला भास्कराने अंती.

महेताबशाला ताडिले
पण एकत्र भोजनही केले
विधर्म्याच्या ठिकाणी प्रेम ठेवा
संदेश मोलाचा,मिळेल सौख्य ठेवा.

*गजानन कमल पुष्प (१७)*

“श्री” गुंतले कवराच्या आर्त भाकेत
चौथ्या प्रहरापर्यंत राहिले उपोषित
कवराची,कांदा,भाजी भाकरी खाल्ली
महाराज,भक्तांना न ठेविती उपेक्षित

तुकारामाच्या मस्तकी शिरला
एक मोठा छरा जोरदार
चौदा वर्ष,मठ ठेवला स्वच्छ
कानातून छरा पडला, गजानन कृपा अपार.

*गजानन कमल पुष्प(१८)*

गोपाळ बुटीची अहंता,गर्व
झटक्यात महाराजांनी ओळखला
भोजनानंतर हरिपाटलासवे
शेगावीचा रस्ता की हो धरला!

परमेश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग
कर्म योग आणि भक्ती
“श्रींनी”उत्तम ओळख दिली तिन्ही मार्गांची
मुक्कामी पोहचणा-यालाच
मिळत असते मुक्ती.

मारूती पंत पटवा-यासाठी
जागविले तिमाजी राखणदाराला
भक्तांसाठी धावतो सदैव
भक्तांची काळजी श्री गजाननाला.

भाद्रपद शुद्ध पंचमी दिनी
संजीवन समाधी घेतली “श्रींनी”
आवडत्या भक्तास दर्शन दिले
समाधी सोहळ्यात रंगली रजनी.

*गजानन कमल पुष्प (१९)*

मुंडगावची बायजाबाई
अनन्य भक्त महाराजांची
लोकापवादापासून वाचविले
“जनाबाई” ती श्री गजाननाची

“श्रींनी” बापुन्या काळ्यास पंढरीला
साक्षात “विठोबा” दाखविला
कवठे गावच्या माळक-याला
साथीच्या रोगातून वाचविला.

*गजानन कमल पुष्प (२०)*

माधव जोशीस तारले
“मन” नदीतून केले पार
प्रार्थना”श्रींना” कळकळीची
दुर्वासनेला जनमनातून करावे हो हद्दपार.

तेज मुद्रा,दृष्टी नी स्वर
कंप तनूस,”श्रींच्या” थोडाफार
अशा थाटात सुभेदारास दर्शन देऊन
कापूस विक्रीत केला फायदा फार

“श्रींच्या” प्रसादाचा केला इन्कार
रस्ता चुकला ,भाऊ कवराचा
श्रीनी योग्य मार्गावर आणले
निष्ठावंत कवरास
पण अवमान नको प्रसादाचा.

“मी आहे येथेच” असे
आश्वासिले होते ,श्रींनी
शब्द खरा करतात महाराज
दिसतेय वरील उदाहरणावरूनी.

*गजानन कमल पुष्प (२१)*

“श्रींचा”अनुभव भक्तांना
आज मितीला ही येतो
जागृत ज्योत”श्रींची” शेगांवी
सांभाळ भक्तांचा सदैव होतो.

मनकर्दमी मंजिरीच्या
गजानन कमल पुष्प उदेले
पुष्पासमान आलिप्तता मिळावी
षड्रिंपु पासून, “श्रीस” कळवळून प्रार्थिले

एकवीस साराध्याय कमलपुष्पे
फुलली मंजिरीच्या मानस सरोवरी
उमलते , फुलविते “श्रीगजानन”
मनोभावे अर्पण”श्री” चरणावरी.

*सौ.मंजिरी अनसिंगकर*

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =