कोरोना काळात एकमेकांचा मानसिक आधार गरजेचा किती आहे हे गेल्या आठ महिन्यात वारंवार दिसुन आले .
शारिरिक उपस्थिती जरी नसली तरी मानसिक आधाराची गरज या कोव्हिड पाॅझिटिव आणि लक्षणे दिसणाऱ्या सर्वानांच जाणवु लागली.
याचकाळात सुंदरवाडी गृप आणि त्याचे २५०+ मेंबर्स यांनाही या गृपने फारच मानसिक आधार दिला आणि गरजेच्या वेळी मदतही केली.
साधारण जुलै २०१५ मधे संस्थापक बाबा वारंग यांच्या सुपिक डोक्यातुन श्री पंचम खेमराज महाविद्यालय ,सावंतवाडी म्हणजेच एसपिके काॅलेज सावंतवाडी मधील माजी विद्यार्थ्यानां एकत्र आणण्याची कल्पना सुचली.पहिल्यांदा त्याने आपल्या संपर्कातील व बिकाॅम या त्याच्या वर्गातील काही सवंगडी जमवले आणि मग माळ गुंफतात तशी एकेक मणी एसपिकेचा त्यात गुंतवत गेले .आजमितीस हा वटवृक्ष २५६ जणांचा झाला आहे .
यानंतर गेट टुगेदर करण्याचे ठरले ते पहिले गेट टुगेदर कांदिवली बोरिवली परिसरात २०१६ साली अगदी पंचवीस तीस जणांच्या उपस्थितीत पार पडले .सुरवातीस पन्नासेक जण या गृपवर जाॅईन झाले होते मात्र हळुहळु संपर्क वाढत गेला आणि मेंबर्स वाढत गेले.
मग २०१७ साली ठाणे मंगला हायस्कूलमध्ये दुसरं गेट टुगेदर पार पडलं.याला जवळपास ८० मेंबर्सनी उपस्थिती लावली. असं करत करत बाॅन्ड घट्ट होत गेले. साखळी जोडत गेली आणि हा सुंदरवाडी गृप वाढतच गेला.
केवळ गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर पुणे, मुंबई इथवरच माजी विद्यार्थी मर्यादित न राहता देशभरातुनच नव्हे तर जगभरातुन एसपिकेचे माजी विद्यार्थी जोडले गेले.
साधारण पंचेचाळीस ते साठ या वयोमानात असलेले हे सारे मेंबर्स एसपिकेचे केसपिके ही बिरूदावली अभिमानाने मिरवतात.
साधारण पंचवीस तीस वर्षे अनेकजण सेटल होणे व पोटपाण्यासाठी विखुरले गेले होते ते इथे एसपिके सुंदरवाडी गृपवर देव पाटेकर आणि सावंतवाडीचा रक्षणकर्ता देव ऊपरलकर यांच्या छत्रछायेखाली एकत्र आले. आणि मग हळुहळु जुना परिचय, जुन्या आठवणी, गंमती जमती शेअर करता करता गृपची वीण अधिकच मजबुत होत गेली.
या गृपवर कुठल्या क्षेत्रातला माणुस नाही ते विचारा …?
वैद्यक क्षेत्रातले डाॅक्टर्स जसे आहेत तसेच संशोधन क्षेत्रातले डाॅक्टर्स लोकही इथे आहेत .
इथला दिवस पहाटे चार वाजुन दोन मिनिटानीं सुरू होतो. गृपचं गेटच या शुभ सकाळ ने गेली दोन वर्षै उघडणाऱ्या रागिणी तोरणे बरोब्बर ४.०२ ही वेळ कशी जमवतात एकही दिवस न चुकता नि वेळ मागेपुढे न होता हे एक न उलगडणारे कोडेच आहे.
यानंतर अनेक देवभक्त मंडळींचे वाराप्रमाणे फोटो, नमस्कार, सुविचार काही अध्यात्मिक पोस्ट वैगरे गृपवर थोड्या थोड्या वेळाने येत राहतात.
मग सूर्य जसजसा वर वर येत जातो गृपवरील वातावरणही थोडं मजा मस्करी नि वादविवादात बदलतं.
एखादा नास्तिक एखाद्या अध्यात्मिक पोस्टवर विरूद्ध कमेंट करतो आणि मग सुरू होतं शाब्दिक द्वंद्वच. अंधश्रद्धेवर काही मोजकेच मेंबर कडाडुन हल्ला करून वातावरण तापवतात आणि मग समोरून प्रचंड मोठ्या प्रमाणात शाब्दिक आक्रमण होतं देवभक्तांचं.
काहीवेळा राजकिय द्वंद्व इथे इतकं रंगतं की वाटतं आता कि गृप सोडून अर्धा विरोधी पक्षच बाहेर पडणार की काय?
सरकार समर्थक आणि सरकार विरोधक (राज्य आणि केंद्र सरकार असे दोन विभागच ) आमने सामने ठाकतात तेव्हा त्या राजकारणी लोकांनाही माहित नसतील एवढ्या गोष्टी गृपवर येतात.
यामधे एक मोठा गृप असा असतो जो केवळ या वादांची मजा घेत वाचत असतो. कधीकधी यातलेच एखाद दुसरे किडा करणारे या वादात मधेच एखादं तेल ओतणारं विधान करतात आणि मस्त गायब होऊन मजा बघतात दुरून.
या वर्गाला मालवणी भाषेत “आड्यावयले ” “दुशीकवडे” असे संबोधले ही जाते. काही वेळा या गृपवरच्या दादा ताई वादाने अनेकजण धास्तावल्याचे दिसतात व आता पुढे काय होईल? अशा विचाराने चिंतीत होतात.
हे वाद कधी दोन चार तास, कधी दिवसभर तर कधी कधी आठवडाभर ही चाललेले असतात.
मोदींचे अच्छे दिन, नोटाबंदी, फार्मा इज मोस्ट करप्टेड इंडस्ट्री, बायकांपेक्षा पुरूष श्रेष्ठ, देव आहे की नाही ?, आत्मा आहे का ?….
वैगरे वैगरे वाद तर आजही अधुनमधुन डोके वर काढतच असतात.
२०१८ साल उजाडलं नि या गृपचं गेट टुगेदर सावंतवाडी मळगाव येथील शालू हाॅल मधे घेण्याचं ठरलं.
पुरे दोन दिवस या हाॅलमधे शंभर सव्वाशे केसपिक्या लोकांनीं अक्षरश: आपलं काॅलेज जीवन या दोन दिवसांत अनुभवलं.
कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेले. एसपिकेचे एकेकाळचे जानेमाने किशोरकुमार महेश आरोलकर याच्या गाण्यानीं बहार आणली …रागिणी तोरणे, यदुनंदन, शाम गावडे…आणि इतर गायक कलाकारानीं एसपिके गॅदरिंगचा फील आणला.
या गेट टुगेदर साठी गावच्या मंडळीनीं खुपच मेहनत घेतली. शालू हाॅलचे मालक व एसपिकेचेच माजी विद्यार्थी आना गावकर,अभय पंडीत, संतोष मुंज, लालू सुराणा, अनिल ठाकूर, सखाराम उर्फ तात्या गवस वैगरे मंगळिनी गेट टुगेदर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
पुन्हा एकदा सगळ्या गृपचे ऋणानुबंध घट्ट होत मित्रमैत्रीणी रम्य आठवणींचा सुगंध घेत जड पावलांनी दोन दिवसांनीं आपापल्या गावी, घरी परतले .
असा हा गृप दिवसेंदिवस प्रगल्भ जबाबदार होत चालला आहे.
अनेक सामाजिक उपक्रम या गृपवरचे केसपिके आपापल्या गावी, आपापल्या एरियात सतत राबित असतात. अनेक विषयांवर चर्चा होते. जिथे शक्य आहे तिथे कामे करण्यासाठी मित्रमैत्रिणींची मदतही घेतली जाते.
यानंतरचं अतिशय अविस्मरणीय असं गेट टुगेदर जे झाले ते अलिबाग येथील कुलपे फार्मवर. अलिबागस्थित सौ.सुखदा आणि श्री.प्रदीप पेडणेकर या एसपिके माजी विद्यार्थी आणि दांपत्याने अतिशय नियोजनबद्ध हे गेट टुगेदर यशस्वी केले.
दोन दिवस दिडशेच्या आसपास लोकांची अप्रतिम निवासी सोय आणि मासे, चिकन, मटण यांची रेलचेल असलेलं अप्रतिम मालवणी, अलिबागी जेवण सगळ्या केसपिकेनां तृप्त करून गेलं.
शेकोटी, गाणी, डान्स , दशावतार, मालवणी गाराणा, तुळशीचं लग्न वैगरे सर्वांचाच सहभाग असलेले कार्यक्रम बेधुंद करून गेले.
आजही या गेट टुगेदरच्या आठवणी गृपवर निघत असतात.
असा हा सुंदरवाडी गृप कधीकधी हळवा होऊन जातो ते परिवारातील एखादा मित्र कायमचा जग सोडुन जातो तेव्हा.
सावंतवाडी गेट टुगेदरच्या आधी बरोबर एक महिना आधी प्रकाश परब याची अचानक एक्झिट सर्वानांच चटका लावणारी होती. गेट टुगेदरला तो सगळ्यानां भेटणार होता. पण नियतीच्या मनात तसं नव्हतं.
त्याआधी डोंबिवलीतील के.डी नाईक हा मित्रही असाच चटका लावत हे जग सोडून गेला .
आणि आता २०२० मधे सगळ्यात मोठा आघात गृपवरचा सगळ्यांचा लाडका विजय जगताप या लाॅकडाऊन काळात हे जग सोडून गेला आणि सर्वजण त्या धक्क्याने आजही सावरलेले नाहीत. अशावेळी केवळ श्रद्धांजली वाहण्याचा या गृपचा कधी हेतू नसतो तर त्या कुटुंबाची विचारपूस, लागलीच तर काही मदत तिथले स्थानिक एसपिके वाले करतातच. सांत्वनही करतात .
हे असे आघात होत असतानाच या सुंदरवाडी परिवारातला आणखी एक तारा निखळला तो म्हणजे मंदार कुळकर्णी .
ती पंधरा दिवसांपूर्वीची सकाळ त्याच्या जाण्याच्या बातमीने हादरविणारी ठरली.
पण ‘शो मस्ट गो ऑन ‘ या नियमाने या गृपने हे ठरवलंय की दुःख तर आहेच पण तेच कवटाळुन न बसता हसत खेळत जे मेंबर्स आहेत त्यांनां मदत करत, आधार देत पुढे जात रहायचं.
ऊद्याची वेळ काय असेल? कोण असेल नसेल सांगता येणार नाही कुणालाच. म्हणून आज जो आहे त्याने जगुन घ्यायला हवं तेही आनंदात. हा इथला अलिखित नियम आहे.
कोरोना काळात गृपवरचे अनेकजण बाधित झाले पण सगळ्या गृपच्या मानसिक पाठिंब्याने ते लगेच बरे होऊनही आले.
याच गृपवरच्या अनेक कोरोना योद्ध्यानीं या आठ महिन्यांत प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कोरोना विरूद्व लढण्याचं काम केलंय
यात माणगांव चे डाॅ.जोशी यांच्यासारखे गृपवरच्या अनेकानां मदत करणारे डाॅक्टर्स आहेत .
तसेच हाॅस्पिटलमधे प्रत्यक्ष काम करणारे ऊज्वला बिरोडकर, साधना महाडेश्वर, स्मिता आजगावकर, शांती राणे, वैगरे ज्ञात अज्ञात मित्रमंडळी आहेत याचा गृपला अभिमान आहे.
बिएमसी मधे याकाळात काम करणारे दिलिप बाईत, संतोष माजगावकर, शिरिष रणसिंग सारखे मदतीला केव्हाही धाऊन जाणारे मित्रही या गृपवर आहेत ज्यानीं अनेकानां मदत करत आपल कर्तव्य चोख बजावले आहे.तर विलास कदम, अशोक हळदणकर या पोलिस अधिकाऱ्यांनीही धोका पत्करत आपलं कर्तव्य चोख बजावलयं व बजावत आहेत.
या गृपवरचे अनेक फार्मा एक्सपर्ट वेळोवेळी गृपला नविन संशोधन व विविध आजारांबद्दल माहिती देत असतात. यातीलच एक फार्मा अधिकारी विलियम्स फर्नांडीस याने तर चार पाच झूम सेशन घेत सगळ्या गृपलाच कोरोना, डायबिटीस, बिपी वैगरे आजारांवर योग्यवेळी मार्गदर्शनही केले
यातील डाॅ.उदय भाट आणि अनिता चव्हाण या इटर्निटी मेडिटेशन रिसर्च मधील दोघानीं मानसिक आरोग्यासाठी आपले तीन इटर्निटी मेडिटेशन व्हिडीयो गृपवर सादर करून गृपचे मानसिक आरोग्य राखण्याचे काम केले.याचबरोबर योगगुरू ज्ञानेश्वर कविटकर यानेही आरोग्यासाठी योग आणि योगासने यांचा व्हिडियो गृपवर सादर केला.
असा हा सर्वांगसुंदर सुंदरवाडी गृप सर्वांचा आवडता असा गृप झालाय.ईथे या गृपमुळे अनेक वर्षे भेटू न शकलेले जुने एसपिकेचे केसपिके भेटले हे केवढं मोठं काम या गृपने केलय .
एकमेकांची काळजी घेत एकमेकानां आनंद देत घेत हा गृप पुढे वाढत चाललेला आहेच. एखादा मेंबर दोन-तीन दिवस गृपवर दिसला नाही तर आपुलकीने चौकशी करणारे जीजी, बाबा, आबा, दादा, ताई, माई, बाई अक्का….सारे इथै आहेतच. पण एखादा चुकतोय असे वाटले तर हक्काने कान उपटणारे पण इथे आहेत.
अनेक नवोदित लेखक, कवी, परिक्षक इथै लिहिते झाले कारण त्यानां हक्काचं घरचं व्यासपिठ इथे मिळालं. सांभाळुन घेणारे मार्गदर्शन करणारे इथे मिळाले.
इथले शिक्षक, टिचर, बाई, मास्तर तर इथले गुरुच आहेत जे सतत सगळ्यांचे कान तृप्तही करतात नि गरजेवेळी कान उपटतातही.
मात्र नविन जाॅईन होणाऱ्या कोणालाही या गृपवर येणारे रोजचे दीडेक हजार मेसेज झेलण्याची तयारी ठेवावी लागते हेही तितकेच खरे.
शेवटी म्हणावसं वाटतंय…
सिंधुदूर्गातली सुंदरवाडी
सुंदरवाडीतलो सदा प्रेमान भरलेलो मोती
एसपिकेचे केसपिके हे …
जणु सुंदर परिवारातील नाती
जय सुंदरवाडी
जय श्री पंचम खेमराज
ऊद्या असू नसू…
पण सारेच आनंदात आहोत आज.
संजू पई,
तळवडा
२७.१०.२०२०
मोबा.९६१९०३९४८४