*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…. लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*आजी आणि चुलीवरचे जेवण..!*
धगधगत्या विस्तवासमोर
धार घामाची झिरपत होती…!
रांधप करता करता आजीच्या
अंगाची कातडी करपत होती…!
“हम दो हमारे दो” आजकाल एकच…! या बदलत्या जमान्यात आजी – आजोबा हे नातं हे एखाद्या गोष्टीतील…परी कथेतील असल्यासारखं वाटू लागलं आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत पिढी झाली, घर सोडून मुले देशी परदेशी विस्थापित झाली…नोकरी, व्यवसायानिमित्त मोठमोठ्या शहरात गेलेली पिढी गाव विसरली… अन् लग्न मुलबाळे झाल्यावर तर घर सुद्धा विसरली. हळूहळू घरची माणसे परकी झाली…तिथे आजी आजोबांची ओळख राहणार कशी?
खरंतर आजी आणि नातवंडे हे नातच अवर्णनीय…! नातू, नात जन्माला आल्यापासून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आईचं प्रेम दुधासारखे तर दुधावरच्या साय प्रमाणे प्रेम असतं ते आजीचं. गरम गरम पाण्याने अंग शेकवून आपल्या मांडीवर घेऊन आंघोळ घालणारी आजी सर्वांची आवडती अन् नातवंडांना पावडर, काजळाचा टीका लावून केलेला नट्टापट्टा आणि वेनीफणी करण्याची आजीची हौस तर भारीच असते. ज्या नातवंडांना आजीकडून असे लाड प्रेम भेटतं ती नक्कीच भाग्यवान…! आजीने कमरेवर घेऊन भरवलेलं अन्न तिच्या कमरेवरच पचून जातं. कमरेवर घेऊन जेव्हा ती अंगणात काऊ चिऊ आल्याचं भासवून घास भरवते तेव्हा आपण हवेत उडत असल्याचा भास होतो…केवळ आजीच्या प्रेमामुळेच…! नातवंडे शाळेतून घरी येताच आजी साय भरल्या दुधाचा टोप पुढ्यात द्यायची तेव्हा तिच्या हृदयातून उतू जाणारं प्रेम आपसूकच दिसून यायचं…!
आजी जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा तिच्यासोबत नजरेसमोर येते ते तिचं चुलीच्या समोर छोट्याशा पाटावर बसून केलेलं जेवण…! आजीने कुळताची पिठी ढवळून घालावी अन् तिची चव जिभेवर रेंगाळत रहावी अशीच होती. खाडीतील ताजे ताजे मासे केवळ मसाल्याच्या पाण्यात कोकम नि मीठ घालून शिजवलेलं तीखलं तर आजही जिभेवर पाणी आणतं. चुलीतील निखाऱ्यावर भाजलेले खाऱ्या पाण्यातील मासे तर अवीट चवीचे…! गावठी कोंबडीचा सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेला चुलीवरचा रस्सा तर अप्रतिमच…!
घरच्या नाचणीचे पीठ पितळीच्या परातीत घेऊन चुलीवरच्या निखाऱ्यावर गरम केलेल्या गरम पाण्याने भागवून मळलेल्या पिठाची भाकरी जेव्हा लोखंडाच्या खोलगट तव्यावर टाकायची अन् थंड पाणी टाकून आपल्या मुलायम हातांनी आजी ते पाणी भाकरीवर फिरवायची तेव्हा किती चटके बसत असतील ना आजीच्या हातांना…? त्या तव्यावर परतलेली नरम नरम भाकरी आजी चुलीतून बाहेर ओढलेल्या निखाऱ्यांवर शेकायची तेव्हा ती भाकरी आकाशातील पौर्णिमेच्या चंद्रासारखी गरगरीत फुगून यायची…अन् भाकरीपेक्षा फुलून यायचा तो आजीचा गोरागोमटा चेहरा…! कधीतरी निखाऱ्यावरील भाकरी टोपलात ठेवताना फुटायची अन् त्यातून बाहेर पडलेली गरम वाफ आजीच्या कोमल हातांचे चुंबन घेऊन पसार व्हायची…आजी सुद्धा आपला भाजलेला हात हलवून थंड पाण्यात बुडवायची आणि हळूवार बोटांवर फुंकर घालत असायची…. खरंच ती फुंकरच तिचं भाजण्यावरचं औषध असायचं… अगदी कधी नातवंडांचा हात भाजला तरी फुंकर आजीच घालायची…!
देश बदलला, प्रगती झाली, विकासाची गंगा आली. आजच्या पेक्षाही पूर्वीचे लोक औषधपाणी न करता शंभर वर्षे निरोगी जगायचे परंतु चुलीच्या धुरामुळे रोग होतात, आयुष्य कमी होतं म्हणत घरोघरी उज्वला आली. चुली कालबाह्य झाल्या तरीही रोगराई वाढल्यावर लोक घरातली चूल बंद करून “चुलीवरचे जेवण” खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाऊ लागले. परमेश्वराला माहिती ते जेवण चुलीवर करतात की कसं? पण माणसाचा आजकाल स्वतःपेक्षा जास्त विश्वास दिखाऊपणा वरच आहे ना…! पुन्हा एकदा आज “जुने ते सोने” याचा प्रत्यय वेळोवेळी येतो परंतु सुशिक्षित किंवा आपण सुधारलेले हा सुधारीतपणा दाखविण्याच्या नादात लोकांनी घरातल्या चुली नामशेष केल्या, लाकूडफाटा वाळवी लागून खराब होतो आणि माणूस मात्र गॅसवर जीवन जगतो. आजी आजोबा जुन्या घरात…तर कोणी वृद्धाश्रमात खितपत पडतात अन् नातवंडे त्यांच्या प्रेम, संस्कारांना पारखी होतात. तीन दगडांच्या कितीही चुली हॉटेलमध्ये मांडल्या तरी “आजी – आजोबा – नातू” या त्रिकुटाचे प्रेम हॉटेलमध्ये विकत मिळेल का…?? हॉटेलच्या चुलीवरच्या जेवणाला तीच आजीच्या हातांची चुलीवरची चव येईल का…???
धगधगत्या निखाऱ्यावर भाजलेली भाकरी असो वा मातीच्या मडक्यात शिजवलेली चुलीवरची उकड्या तांदळाची पेज… नि फणसाच्या कुवऱ्यांची, गऱ्यांची भाजी.. माश्याचं कालवण… आजीच्या चुलीवरच्या जेवणाला एक वेगळाच वास असायचा…आणि त्या वासावरच चार घास पोटात जास्त जायचे…अन् तृप्तीचा ढेकर द्यायचे…!
आजीच्या त्या चुलीवरच्या जेवणाची चव आजच्या डॉमिनोजच्या पिझ्झा बर्गरला नाही…की ताजच्या बटर चिकनला नाही…ती चव चाखायला पुन्हा एकदा भूतकाळातच जावं लागेल हे मात्र खरं…!
©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६