सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी
रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग यशवंतगड येथे गडाच्या तटबंदीला लागून होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची पहाणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी कार्यकर्त्यांसह केली. यावेळी तटबंदीलगत मोठ्याप्रमाणात उत्खनन करण्यात आले असून यामुळे तटबंदीला मोठ्याप्रमाणात धोका निर्माण झाला आहे. येथे होत असलेल्या बांधकामाला परवानगी कोणी दिली? एवढ्या मोठ्याप्रमाणात उत्खनन होई पर्यंत शासकीय यंत्रणा झोपली होती का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जलदुर्गाला धोका पोहोचवणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? हे कृत्य म्हणजे संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीच्या कलमानुसार मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे. यावेळी वेगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ डोंगरे,वेंगुर्ला पंचायत समीतीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, अभिजीत राणे,आनंद गोडकर इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.