You are currently viewing निधीबाबत सावंतवाडीवर अन्याय; नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप

निधीबाबत सावंतवाडीवर अन्याय; नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप

सावंतवाडी

जिल्हा नियोजनचा निधी देण्यास पालकमंत्र्यांनी सावंतवाडीवर अन्याय केला. जिल्ह्याच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचे पटत नसल्याने सावंतवाडी शहराला निधी मिळत नाही, असा आरोप नगराध्यक्ष संजु परब यांनी आज येथे केला.

जिल्हा नियोजनचा निधी देण्यास पालकमंत्री यांनी सावंतवाडी शहरावर अन्याय केला आहे. त्यामुळे आपण आमदार या नात्याने दीपक केसरकर यांच्याकडे पंधरा लाख रुपये निधीची मागणी केली आहे ते देतील अशी अपेक्षा आहे, असेही परब यांनी सांगितले. येथील पालिकेच्या लोकमान्य सभागृहात नगराध्यक्ष श्री. परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आजी-माजी पालकमंत्र्यांवर टीका केली. नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, अनिल सावंत, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

श्री. परब म्हणाले, “”सावंतवाडीचे आमदार केसरकर हे कार्यक्षम असून त्यांच्या या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्रीपद गेले आहे. सध्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी त्यांचे पटत नसुन स्वतः केसरकर याबाबत खासगीत चर्चा करतात. दोघांच्या भांडणात सावंतवाडी शहराला निधी मिळत नाही. केसरकर हे आमदार म्हणून पुन्हा निवडून आल्यानंतर मतदार संघातच दिसत नाहीत. अधून-मधून अमावस्या-पौर्णिमेला सारखे ते याठिकाणी येतात व पुन्हा मुंबईला जातात. त्यामुळे त्यांची ही परिस्थिती अशीच पुढे राहिल्यास त्यांच्याकडे असलेली आमदारकी ही भविष्यात जाईल.”

श्री. परब पुढे म्हणाले, “”संविधानाद्वारे हा देश चालतो. संपूर्ण देशात कोरोनाचे संकट असताना आहे काही राज्याच्या निवडणूका झाल्या. महाराष्ट्र राज्यातही पालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पार पडल्या. काही ठिकाणी जिल्हा बॅंकेच्याही निवडणुका झाल्या; मात्र असे असताना केवळ एक हजार सभासद असणारी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुका तब्बल चौदा महिने पुढे ढकली जाते यामागे गौंडबंगाल आहे. इतर निवडणुका होतात मग जिल्हा बॅंकेची निवडणूक का होत नाही ? काही झाले तरी जिल्हा बॅंकेमध्ये भाजपचीच सत्ता येणार यात तिळमात्र शंका नाही.”

आठवडा बाजार सुरुच राहणार

वाढत्या कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्य शासनाकडून कडक नियमावली राबवण्यात आली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सावंतवाडी शहराचा आठवडा बाजार भरणार का असे नगराध्यक्ष श्री. परब यांना विचारले असता जोपर्यंत जिल्हाधिकारी यांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आठवडा बाजार सुरूच राहील, असे सांगितले नागरिकांनीही स्वतःची काळजी स्वतः घ्यावी व इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 16 =