You are currently viewing कथाकार प्रा. डॉ. आनंद आहिरे यांचे सहावे पुस्तक डोळ्यासमोरच्या कथा पदमश्री विनायकजी खेडेकर यांच्या हस्ते गोवा येथे प्रकाशन

कथाकार प्रा. डॉ. आनंद आहिरे यांचे सहावे पुस्तक डोळ्यासमोरच्या कथा पदमश्री विनायकजी खेडेकर यांच्या हस्ते गोवा येथे प्रकाशन

समाजातील नायक, नायिकांचे विदारक दुःख, संघर्ष, त्यातून साधलेला उत्कर्ष:-प्रा. डॉ. संघर्ष सावळे

रविवार दि.5 फेब्रुवारी 2023 रोजी 1ले राष्ट्रीय प्रवासी कविसंमेलन वास्को, गोवा येथे प्रा. डॉ. आनंद आहिरे यांचे सहावे पुस्तक ‘डोळ्यासमोरच्या कथा’ कथासंग्रह गोवा राज्यातील राजदूत, पदमश्री मा. विनायकजी खेडेकर, मुरगाव हायस्कूल मुख्याध्यापक मा. तुळशीदास देसाई, मा. चित्रा क्षीरसागर (जेष्ठ कवयित्री ), मा. कालिका बापट (गोवा दूरदर्शन, निवेदिका ) आणि प्रा. डॉ. आनंद आहिरे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.


प्रा. डॉ. आनंद आहिरे यांचे डोळ्यासमोरच्या कथा हे पुस्तक ज्ञानसिंधू प्रकाशक नाशिक यांनी केले असून या पुस्तकात एकूण 15कथा आहेत. ग्रामीण व शहरी बाजाचे चित्रण त्यात असून सरांच्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना, प्रसंग, कथेच्या सूत्रात मांडून कल्पनेची झालर देऊन मांडलेल्या आहेत. प्रत्येक कथेतील पात्राचे जीवन हे मध्यमवर्गीय जरी असले तरी आपल्या जिवनातून समाजाला आदर्शवत जगण्याचा संदेश देते. अस्सल शहरी व ग्रामीण भाषेचा वापर कथासंग्रहात दिसून येतो. प्रसंगी विनोदी भाषेमुळे हसता हसता वाचकाला अंतर्मुख व विचारमुख करायला लावते.क्लीस्ट व दुरुबोध भाषेचा वापर कुठेच दिसून येत नाही. म्हणून प्रत्येक कथा या आपल्या सभोवताळच्या किंवा जणू आपल्याच आहे असे वाटते.
पुरुष नायिकाबरोबर स्त्री नायिकाचे चित्रण कथा संग्रहात आलेले आहे. या कथा संग्रहात वास्तविक जीवनाची झुल दिसते. गावचा पंढरी हा किती कष्टकरी आहे. उतरवय झाले तरीही कष्टच करत असतो. त्यातून तो सद्या गावचा पोलीस पाटील आहे. कष्टातून झालेले परिवर्तन खरोखर आदर्शवत आहे. लक्ष्मी, इंदुबाई, सोनाली या कथेतून परिस्थिती कितीही वाईट असली तरीही न डगमगता येणाऱ्या पिढीला घडवणे व परिवर्तन करणे हा आदर्श वाचक घेतल्यावाचून राहणार नाही. गावच्या तलाठीला गावकरी कंटाळले. गावकरी तलाठ्याला कसे सापळ्यात अडकवतात. हे विनोदी पद्धतीने लेखकाने मांडले आहे. लेखकांच्या लेखनाची कस त्यातून दिसते. अशा विविध आशय सूत्राचा वापर करून डोळ्यासमोरच्या कथा हा कथा संग्रह प्रा.डॉ. आनंद आहिरे यांनी मांडला आहे. हा कथासंग्रह वाचक डोळ्यात साठवल्याशिवाय राहणार नाही.
अभ्यासक, समीक्षक :-प्रा. डॉ. संघर्ष सावळे

प्रतिक्रिया व्यक्त करा