तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान…
सावंतवाडी
तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ११० प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली. दरम्यान याप्रसंगी कोरोनाच्या काळात योद्धा म्हणून काम केलेल्या तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याबाबतची माहिती श्री.दळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी लाभार्थ्यांची ११० प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यात संजय गांधी निराधार अनुदान (विधवा/ अपंग लाभार्थी) योजनेअंतर्गत ७३ मंजूर, इंदिरा गांधी (राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन लाभार्थील योजनेअंतर्गत ४० मंजूर, संजय गांधी (श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन भाग ब) योजनेअंतर्गत ३० मंजूर, इंदिरा गांधी (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन भाग अ) योजनेअंतर्गत ०३ मंजूर आदींचा समावेश आहे.
यावेळी सदस्य गजानन नाटेकर, नारायण राणे, भारती मोरे, उदय परिपत्ये, दिगंबर परब, अजित नातू, अनिल जाधव, संजय देसाई, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक, नगरपालिका प्रतिनिधी एकनाथ पाटील, संजय गांधी योजना कार्यालय प्रमुख धोंडी मेस्त्री, छाया तावडे आदी उपस्थित होते.