कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये ज्या कॉम्प्लेक्स संदर्भात सांडपाण्याच्या समस्या आहेत त्या विकासकावर तसेच गृहनिर्माण संस्थेवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी नगरसेवकांनी केली. तसेच ज्या विकासकाने सांडपाण्यासंदर्भात नियम धाब्यावर बसवले आहेत अशा विकासकाच्या पुढील डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी देण्यात येऊ नये अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, भाजप गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक श्रेया गवंडे, किरण शिंदे, अक्षता खटावकर, श्रुती वर्दम, उदय मांजरेकर, राजीव कुडाळकर, निलेश परब, प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, ज्योती जळवी, सई काळप, संतोष शिरसाट उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांजरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर जलपरी चिपकर हिचा अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला. बैठकीमध्ये रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये नगराध्यक्ष करोल यांनी सांगितले की अद्याप उपविधी तयार झालेली नाही फक्त आम्ही कारवाई करू शकतो पण दंडात्मक कारवाई करू शकत नाही. असे सांगितले तसेच या सभेमध्ये विकास कामांवरून गदारोळ झाला.
दरम्यान या सभेमध्ये सांडपाणी विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली आरोग्य निरीक्षक संदीप कोरगांवकर यांना विचारण्यात आले की, किती कॉम्प्लेक्स बाबत तक्रारी आहेत. आणि सांडपाण्या संदर्भात आपण त्या ठिकाणी कोणती कार्यवाही केली याची माहिती द्यावी सांडपाण्याचा प्रश्न १२ कॉम्प्लेक्स मध्ये असून त्यातील १० कॉम्प्लेक्स हे गृहनिर्माण संस्थांच्या असून २ कॉम्प्लेक्स विकासाकडे आहेत. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे.
असे त्यांनी सांगितल्यानंतर भाजपचे गटनेते विलास कुडाळकर व नगरसेविका सौ संध्या तेरसे यांनी विचारणा केली की, या सांडपाणी निचरा न करणाऱ्या कॉम्प्लेक्सवर साधारण कधी कारवाई होणार की फक्त पत्र देऊन नगरपंचायत प्रशासन गप्प बसणार? असा सवाल उपस्थित केला तसेच गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की शुभम शांती कॉम्प्लेक्सच्या सांडपाण्या संदर्भात काय झाले त्या विकासाकावर कोणती कारवाई करण्यात आली आहे तर आरोग्य निरीक्षक संदीप कोरगावकर यांनी सांगितले की त्याबाबत कारवाई करण्यात आली आहे सांडपाणी बंद करण्यात आले आहे तसेच त्यांना पत्रही देण्यात आले आहे त्यानंतर गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की शुभम शांतीचे जे विकासक आहेत त्यांच्या कुडाळ शहरातील इतर डेव्हलपमेंट प्लॅनला नगरपंचायतीने मंजुरी देऊ नये याबाबत उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी सांगितले की, अशा विकासाकांवर कारवाई करणे उचित ठरणार आहे त्यांच्या पुढील डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी देण्यात येऊ नये या संदर्भाचा ठराव पुढील सभेत विषय पत्रिकेवर ठेवून घेण्यात येईल असे सांगितले. या सभेमध्ये नगरपंचायतीचे कित्येक वर्ष सुरू असलेले रास्त धान्य दुकानही शासनाला परत करण्याचा ठराव घेण्यात आला.