You are currently viewing गिरणी कामगारांचे गुरुवारी ठिय्या आंदोलन

गिरणी कामगारांचे गुरुवारी ठिय्या आंदोलन

*गिरणी कामगारांचे गुरुवारी ठिय्या आंदोलन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

एनटीसी गिरण्या पूर्ववत सुरू करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस लांबत चालला आहे. ५० टक्के पगार कामगारांना मिळत होता, तोही गेल्या पाच महिन्यांपासून मिळणे बंद झाला आहे. त्यामुळे मुंबईतील चार, तर राज्यातील बार्शी, अचलपूर अशा महाराष्ट्रांमधील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनटीसीच्या सहा गिरण्यांतील कामगारांमध्ये संतापाची लाट उसळून आली आहे. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आता आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

मार्च २०२० मधील लॉकडाऊन नंतर गेले दोन वर्षे एनटीसीच्या या सहा गिरण्या केंद्र सरकारने सुरूच केलेल्या नाहीत. हा प्रश्न देशभरातील एनटीसीच्या २३ गिरण्यातील कामगारांमध्ये चिंताग्रस्त होऊन बसला आहे. परंतु सर्वाधिक गिरण्या महाराष्ट्रात असून, त्यामुळे राज्यातील सहा गिरण्यांतील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मिळून जवळपास दहा हजार लोकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.

संघटनेचे व राष्ट्रीय समन्वय कृती समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक आंदोलने छेडण्यात आली.

काळाचौकी येथील इंडिया यूनायटेड मिल क्रमांक ५, लोअर परेल येथील पोद्दार, परेल येथील टाटा आणि लालबाग येथील दिग्विजय मिल अशा चार ठिकाणच्या कामगारांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या झेंड्याखाली एकाच दिवशी, एकाच वेळी आपापल्या गिरण्यांवर येत्या ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून आक्रोश व्यक्त करण्यासाठी “ठिय्या आंदोलन” आयोजिले आहे. आज उपासमारीने कामगार त्रस्त झाले आहेत. तेव्हा या पार्श्वभूमीवर कामगारांच्या अंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने या प्रश्नावर त्वरीत तोडगा काढावा, अशी कामगारांनी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा