You are currently viewing तब्बल १ वर्ष होऊनही शासनाच्या महोत्सवाचे मानधन रखडले

तब्बल १ वर्ष होऊनही शासनाच्या महोत्सवाचे मानधन रखडले

*व्यावसायिक नाट्य संस्थेची तुटपुंज्या मानधनावर बोळवण*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून दर वर्षी मार्च महिन्यात ‘महिला कला महोत्सव’ घेण्यात येतो. पु. ल. देशपांडे कला अकादमी प्रभादेवी येथे प्रकल्प संचालक यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रम ठरवले जातात. मात्र गेली काही वर्षे शासनाच्या या महोत्सवाच्या मानधनात अनेक लहान-मोठे घोळ घातले जातात याची कुणकुण कायमच वृत्तपत्र प्रतिनिधींना असते, पण त्याविषयी अनेक संस्था किंवा त्यांचे निर्माते उघडपणे बोलायला पुढे येत नाहीत. असाच एक रंगकर्मी अभिनेता आणि व्यावसायिक व समांतर नाट्य निर्माता आकाश भडसावळे यांनी मात्र एका वर्षांनंतर हे मौन तोडायचे ठरवले आणि आम्हांला माहिती पुरविली. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘अभिजात’ या त्यांच्या संस्थेच्या ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांनी निश्चित केला. त्यावेळी मा. बिभीषण चवरे हे प्रकल्प संचालक आणि सांस्कृतिक संचालक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत होते. त्यांच्या सूचनेनुसार समन्वयक विनायक सैद यांनी प्रयोग निश्चित केला. प्रयोगाच्या मानधनाचे रीतसर पत्र संस्थेकडून अकादमीस देण्यात आले. दि. १२ मार्च २०२२ ला प्रयोग सादर करायचा होता. मात्र शासकीय घोळच इतका होता की प्रयोग आधी सायंकाळी, मग दुपारी आणि नंतर सकाळी असा अनेक वेळा बदलण्यात आला. तरीही ठरलेल्या दिवशी प्रयोग सादर झाला.

प्रयोगानंतर एका महिन्यात शासनाकडून मानधन जमा होते, ते खात्यावर जमा झाले नाही. मात्र शासकीय पैसे बुडणार नाहीत माहीत असल्यामुळे नेहमीच्या संस्था फार काही पाठपुरावा करीत नाहीत. पण या प्रकरणी समन्वयक म्हणून विनायक सैद यांना विचारले असता त्यांनी फार काही सांगायचे कष्ट घेतले नाहीत. हे समन्वयक म्हणायचे की (फक्त इव्हेंट मॅनेजर असा प्रश्न पडल्यास नवल नाही) शासन आणि कला संस्था यांच्यात समन्वय साधणे हे त्यांचे काम आहे की अर्धवट केलेल्या कामाचे पैसे घेऊन हात वर करणे? तरीही कसेबसे जुलै २०२२ दरम्यान पैसे खात्यात जमा झाले. परंतु जे पैसे जमा झाले ते ठरलेल्या रकमेच्या ७०% च, ज्यात नाटकाचा खर्चही भागणार नव्हता. आधीच नाटकाचे मानधन कमी करवून तडजोड करून प्रयोग निश्चित केला होता, तेव्हा ठरलेले पैसे तरी मिळावेत असे आकाश भडसावळे याला वाटत आहे. मग आता उर्वरित पैशांचे काय झाले याच्या विचारणीसाठी सुरू झाल्या अकादमीच्या फेऱ्या आणि अर्ज प्रक्रिया!

पु. ल. देशपांडे अकादमीत वेगळाच गोंधळ, तिथल्या कर्मचारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सरळ हात झटकले. आकाश भडसावळे यांनी चौकशी करा म्हंटलं तर तुमचं तुम्ही बघा म्हणाल्या. त्यामुळे तिथे शाब्दिक वादावादी झाली तर ‘शासकीय कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करता म्हणून तक्रार करेन; त्यात मी स्त्री आहे.’ असे उलट बोल कानावर पडले. आता विषाची परीक्षा नको म्हणून भडसावळे यांनी थेट संचालकांना गाठले, जे या आधी महिला महोत्सवाच्या वेळेस प्रकल्प संचालक म्हणून अकादमीत कार्यरत होते. त्यांच्याकडून जरा दिलासादायक चित्र दिसले. परंतु नवीन प्रकल्प संचालक आल्याने मी फार लक्ष घालू शकत नाही असे उत्तरही मिळाले. तरीही त्यांनी आश्वासन दिले. मात्र त्याही गोष्टीला आज ६ ते ८ महिने उलटल्यावरही पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत. म्हणजे महिला महोत्सवाच्या कार्यक्रमाला ११ महिने होऊनही व्यावसायिक नाट्य निर्मिती संस्थासुद्धा मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.

आकाश भडसावळे बद्दल सांगायचे तर मूळ तो अभिनेता आहे. अभिनयात त्याने नुकताच एका दिवसात सलग १२ एक अंकी नाटके सादर करून नवीन विश्वविक्रम केला असून तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पाठवला आहे. त्याने आजवर महत्वाच्या अशा १२ नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘होय मी सावरकर बोलतोय’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘संगीत चंद्रप्रिया’ ही त्याच्या अभिनय कारकिर्दीतील महत्वाची नाटके. सध्या त्याची ‘वासूची सासू’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. वासूची सासू हे नाटक त्याच्या निर्मिती संस्थेचे ‘अभिजात’चे ४ थे नाटक आहे. एनएसडी महोत्सव आणि दूरदर्शन साठीही त्याने नाटके सादर केली आहेत. अशा एका धडपड्या आणि प्रामाणिक कलाकार व निर्मात्याची शासनाकडून ठरलेली रक्कम न देताच बोळवण होणार असेल तर कला क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करायला पुढे कोण येणार असा सवाल उपस्थित होतो.

नुकताच शासनाने जो ३ दिवसीय पंडित भीमसेन जोशी महोत्सव घेतला त्यात मानवी जीविताला धोका आणणाऱ्या अनेक घटना घडूनही त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. त्या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून विनायक सैद यांना जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाबाबत पु. ल. देशपांडे अकादमीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा