You are currently viewing भाग्यवंत आम्ही

भाग्यवंत आम्ही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शुभांगी काळे लिखित लतादीदींना श्रद्धांजलीपर काव्यरचना*

 

*”लता” (प्रथम पुण्यस्मरण)*

  “भाग्यवंत आम्ही”

**************************

एक ऐकिली आम्ही बासुरी

‘ना’ राधेच्या कृष्णाची

गोड सुरीली शारद वीणा

गोमंतक मंगेशाची॥

 

गळा मुलायम रेशीम झालर

स्वरस्पर्श असा हळुवार

तरल साधना सरगम कोमल

सोनेरी संसार ॥१॥

 

स्वरास्वरांचा अथांग सागर

गीत ऐकता झुकले अंबर

कलश घेऊनि आली पौर्णिमा

कोकिळ पंचम संगम सुंदर ॥२॥

 

किती तारका अंबरी फुलल्या

किती चंद्र झाले ओले

किती बरसले मेघही आणिक

संगीत झरझर झरले ॥३॥

 

असा ऐकला सतारीतला

आम्ही तेजोमय झंकार

आणि मिळाले अंतरंगीच्या

आयुष्याचे सार॥४॥

 

जिच्या सूरांनीआम्ही जागलो अन्

निद्रेतही मग रमलो

काळजातल्या त्याच स्वरांच्या

घरट्यामध्ये घडलो॥५॥

 

स्वप्न जणू हे परमात्म्याचे

रुप मनोहर कामधेनूचे

गंधसुमन हे कल्पतरूचे

प्रगल्भ लेणे स्वरप्रतिभेचे॥६॥

 

भाग्यवंत आम्ही आम्हा लाभली

अलौकिक ही लता

या जगताच्या मनपटलावर

सप्तसूर कविता॥७॥

 

दीनानाथ हृदयाची ताई

आशा-उषा अन् मीना माई

अंगणी लाडिक फुलली जाई

थोर कुलाची बहु पुण्याई॥८॥

 

अबोल झाली माझी बोली

अशी ही लतिका कुठे हरवली

नाही-नाही हो आसमंती या

एक बासुरी गात राहिली॥९॥

 

कवयित्री—शुभांगी-मंगल काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =