मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाणारा तरुण या जिल्ह्यात थांबविण्यासाठी या ठिकाणी उद्योग आणण्याची गरज आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. दरम्यान त्यासाठी बोंडूवर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी निर्माण झाल्यास “इथेनॉल” रंग बनवण्याचे केमिकल बनवण्यासाठी आवश्यक असलेले “रॉ” मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते आणि त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. ते आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या “आनंदोत्सव” मेळाव्यात बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, जिल्ह्याने भाजपला भरभरून दिले आहे. या जिल्ह्यात एकच गोष्ट अशी आहे की येथील तरूण नोकरीनिमित्त शहराच्या दिशेने जातो. तो इथेच स्थिर होण्यासाठी काही प्रकल्प सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आणण्याची गरज आहे. गेल्या वेळी चूक झाली ती करू नका. हे प्रकल्प झालेच पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न करावेत. अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. या भागात काजू मोठ्या प्रमाणात होतो. काजूचा दर कमी जास्त होतो. बोंडूला किंमत १ रूपयाला घेतो. त्यात संशोधन झाले त्या बोंडूपासून प्रक्रिया केली तर इथेलॉन, रंग बनविण्याचे केमिकल्स, ७० ते ८० कोटीचा प्रकल्प झाला तर बोंडूला सात रूपये दर मिळेल. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत असताना या जिल्ह्यात कुशल कामगार आहेत. प्रकल्प करताना तरूणांसाठी विशेष कार्यक्रम, सुतारकाम कार्यक्रम केल्यास एक हजार तरूणांना सुतारकाम करून उत्पन्न मिळविण्याची वेगळी संधी मिळणार आहे. यासाठी विशेष लक्ष दिले तर जिल्ह्यातील तरूणांना त्याचा फायदा होईल. जिल्ह्यात मोठी पिके घेणे शक्य नाही. बराच कालावधी जातो.
यासाठी हळदक्रांती केली आहे. बुशमिरी, तरूणांना, शेतकर्यांना चांगले उत्पन्न देेऊ शकतात यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या कोकणाला, प्रत्येक तरूणाला तुमच्यावर विश्वास आहे. येणार्या रोजगार निर्मितीसाठी तरूण इथेच राहिला पाहिजे. त्याचे स्थलांतर होता नये त्यांना इथेच रोजगार मिळायला हवा यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. श्री. तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वास्तूचे भूमिपूजन होत आहे. जो विश्वास दाखविला सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर, मनापासून काम केल्यामुळेच ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. सर्व निवडणूका जिंकल्याने जिल्हावासियांच्या काही अपेक्षा आहेत. सी-वर्ल्ड, नाणार, आडाळी हे प्रकल्प लक्ष घालून नेतेमंडळींनी जिल्ह्यातील युवा युवतींसाठी जिल्ह्यातच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यासाठी किमान एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिलात तर या जिल्ह्याचा आगळावेगळा कायापालट होईल.
येत्या काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात आणण्याचा सर्वांनी निर्धार करूया. नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बदलतोय, जिल्हा स्थिरावतोय हे या जिल्ह्याच्या विकासाचा प्रवास ज्या पद्धतीने होतोय. त्याचे प्रतिबिंब व्यासपीठावर दिसत आहे. जिल्ह्यातील जनतेने प्रत्येक निवडणुकीत दाखवून दिले की जिल्ह्याचा विकास, तरूणांचा विकास हा भाजपशिवाय होऊ शकत नाही. एवढा विश्वास दाखविला आहे. जसा जिल्हा बदलतोय, स्थिरावतोय तसेच येणार्या काळात मुंबई पालिकेत मुंबई बदलतेय, मुंबई स्थिरावतेय अशी घोषवाक्य द्यायची आहेत. पुढील आंगणेवाडीच्या यात्रेत अशीच सभा होईल त्या सभेत मुंबईचे पालिकेचे नगरसेवक, महापौर इथे बसलेला असेल. जिल्ह्यातील जनतेने, कोकणातील जनतेने भाजपवर विश्वास टाकून लोकप्रतिनिधी निवडून दिले. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सगळ्यांनी ताकद लावून कमळ फुलवायचे आहेत. कल्याण, डोंबिवली, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा नगरसेवक निवडून आणण्याची जिद्द आणि संकल्प करायला हवा. भाजपच मुंबईचे, कोकणचे भवितव्य घडवू शकते हा विचार येथून घेऊन जावा असे आवाहन त्यांनी केले.