कणकवली
शासनाच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखली जावी व परिसर सुंदर व आरोग्यदायी राहवा, यासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘स्वच्छता दिवस’ पाळण्यात येणार आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सर्वांगीण स्वच्छता करण्यात यावी असे आदेश आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक धीरज कुमार यांनी दिले आहेत. प्रथम मोहीम ४ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार असून नंतर दरमहा प्रथम शनिवारी ‘स्वच्छता दिवस’ पाळण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत, आरोग्य संस्थांमधील परिसर, आंतररुग्ण विभाग स्वच्छतागृहे, बालरुग्ण विभाग, भांडार विभाग इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी,निर्लेखना साठीचे साहित्य वेगळ्या ठिकाणी लावण्यात यावे,कॉरिडॉर, वॉर्ड, ओटी, स्वच्छतागृह येथे कोणतीही अडगळीची वस्तू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, सर्व कर्मचारी व अधिकारी या स्वच्छता अभियानात सहभागी राहतील, याची दक्षता घ्यावी,जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी या दिवशी अचानक संस्थांना भेटीचे नियोजन करावे, स्थानिक स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी यांचाही श्रमदानासाठी सहभाग घ्यावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हे अभियान दरमहा सुरू राहणार आहे. त्याच्या अहवालांचे सचित्र संकलन हे जिल्हास्तरावरून उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. या अभियानाचा नियमित आढावा उपसंचालक स्तरावर घेण्यात येणार असून मासिक अहवाल आयुक्तालयास सादर केला जाणार आहे. सर्व आरोग्य संस्था स्वच्छ राहतील, याची दक्षता घ्यावी व लोकसहभागातून आरोग्य सेवा सुंदर, स्वच्छ व लोकाभिमुख कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.