राज्यातील जनतेला सुखी ठेव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी
राज्यातील जनतेला, शेतकऱ्याला सुखी ठेव असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी मातेला घातले.
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेवून मोठ्या भक्तीभावाने देवीची ओटी भरली. त्यानंतर देवस्थानाकडून झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. कालीदास कोळंबकर, आ. नितेश राणे, माजी खा. निलेश राणे, माजी आ. रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.
ओटी भरण कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोकण – क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याची बाब विचाराधीन आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाच्या धरतीवर मुंबई – सिंधुदुर्ग या रस्ते मार्गाचा विकास करण्यात येईल. जेणेकरुन कोकणच्या विकासाला पर्यायाने पर्यटनाला चालना मिळेल. कोकणच्या सर्वांगिण विकासाकरिता सरकार कटीबध्द असून याकरिता आपण केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगत भराडी देवीच्या मान्यवरांनी भक्त निवासाचा प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या स्थैर्यासाठी आपण भराडी देवीला साकडे घातले असून हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त करून आंगणे कुटुंबियांनी भाविकांची काळजी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रात्री १२:३० वाजता आंगणे कुटुंबियाकडून देवीची ओटी भरण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते.