You are currently viewing भराडी देवीच्या यात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी; चोख बंदोबस्त

भराडी देवीच्या यात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी; चोख बंदोबस्त

मालवण:

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रे देवी भराडी आईचा आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जत्रोत्सव सोहळा असून हा सोहळा तीन दिवस चालणार आहे. भक्तांच्या मांदियाळीत आई भराडी देवीचा परिसर गजबजला आहे. भाजपचा आनंदोत्सव मेळावा आणि त्यानिमित्त भाजपचे येणारे मंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे २ वर्षानंतर येणारी ही जत्रा या सर्वांचा विचार करून आंगणेवाडीत चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. जत्रेनिमित्त संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून नेत्रदीपक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने आठ रांगांची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये एक रांग अपंगासाठी राखून ठेवण्यात आलेली आहे . खाद्यपदार्थ , खेळणी ,कपडे इत्यादी वस्तूंचे स्टॉल सर्वत्र लावण्यात आले आहे.

भराडी देवीच्या दर्शनासाठी सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उद्योग मंत्री उदय सामंत ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी मान्यवर उपस्थित होते . तर संध्याकाळी चार नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे , राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

सायंकाळच्या सत्रात भाजप तर्फे “आनंदउत्सव मेळावा ” या विशाल अशा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे . सभेसाठी भव्य आणि देखणे व्यासपीठ उभारण्यात आले आहे .50000 पेक्षा जास्त भाजप कार्यकर्ते सभेला उपस्थित राहतील असे असा दावा भाजप तर्फे करण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने एसटी बसेसची व्यवस्था केली असून गावागावातून आंगणेवाडीच्या दिशेने बसेस सुटणार आहेत. पोलीस प्रशासनाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष व्यवस्था केली आहे . कोरोना काळात आणि गेल्या वर्षी काहीशी रोडावलेली भाविक संख्या यंदा मात्र विक्रमी संख्या गाठील असा विश्वास भराडी देवी मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा