*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे यांचा चौथा काव्यसंग्रह “तिपेडी” अ.भा.सा. संमेलन वर्धा येथे प्रकाशित होत आहे त्यानिमित्त त्यांचे मनोगत अन् गझल*
*गझल१०८_जयराम धोंगडे*
*’संमेलन टू संमेलन’ शृंखलेच्या निमित्ताने….*
९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे २२, २३ व २४ एप्रिल २०२२ ला संपन्न झाले. या संमेलनात माझे दोन काव्यसंग्रह ‘कोरोनायण’ आणि ‘जय बोले’ प्रकाशित झाले. जीवनात मी पहिल्यांदाच साहित्य संमेलनात सहभागी झालो होतो. खूपच चांगला आणि आनंददायी असा हा साहित्य सोहळा मी अनुभवला.
या संमेलनातून परततांना उगाच माझ्या मनात विचार आला की येणाऱ्या ९६ व्या संमेलनापर्यंत आपण मराठी गझला लिहाव्यात… पाहू किती लिहू शकू ते… आणि लागलीच सोशल मीडियावर (फेसबुक आणि व्हाट्सअप)
मी रोज ‘संमेलन टू संमेलन’ म्हणून माझी एक शृंखला सुरू केली.
१ मे २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ अशा मोजून ९ महिन्याच्या कालखंडात माझ्याकडून १०८ गझल रचना लिहून पूर्ण झाल्या. (यात कविता, अभंग, सुटे शेर, चारोळी इ. चा समावेश नाही) ‘गझलेची जपमाळ’च पूर्ण झाली म्हणा ना!
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ ला आता वर्ध्यात संपन्न होत आहे. या संमेलनात माझा चौथा काव्यसंग्रह ‘तिपेडी’ प्रकाशित होत आहे, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. ‘संमेलन टू संमेलन’ या शृंखलेची मी स्वानंदाने सांगता करीत आहे. (अर्थात गझल लिहिणे चालूच राहील)
२०२३ मध्ये निरनिराळ्या साहित्यिकांचे साहित्य (ज्यांनी मला प्रेमाने आवर्जून पाठविले आहे, पाठवत आहेत) वाचण्याचा आणि त्याचे रसग्रहण करण्याचा माझा मानस आहे. आता नव्याने साप्ताहिक सदर ‘रसास्वाद’ सुरु करून ९७ व्या संमेलनाच्या दिशेने मार्गक्रमण करीत साहित्याची ‘जपमाळ’ अशीच सदोदित जपण्याचा संकल्प आहे.
दर रविवारी एक असे नियमित समीक्षण लिहिले जावे, ही माता शारदेच्या चरणी नम्र प्रार्थना आणि आपणासारख्या रसिक मायबाप चाहत्यांचे आशीर्वाद आणि प्रतिक्रियारुपी ऊर्जा कायम पाठीशी आहे… आणि त्याच बळावर हा संकल्पही सिद्धीस जाईल, याची मला खात्री आहे!
धन्यवाद!
———————————–
#गझल१०८_जयरामधोंगडे
आजची गझल
गझल क्र. १०८
———————————–
आई
आठव तुझा सरेना परतून ये ग आई
येताच दिन सुखाचे केली उगाच घाई!
खाऊन फार खस्ता काबाडकष्ट केले
झिजवून देह आम्हा तू पोसलेस शाही!
जाणे तुझे अकाली सलते मनात माझ्या
निष्ठूर देव झाला अंगांग होय लाही!
साऱ्या जबाबदाऱ्या त्वा पार पाडल्या पण
नसणे तुझे अताशा होतेय क्लेशदायी!
साऱ्या सणासुदीला बघ कोपरा मनाचा
तुज शोधतो बिचारा व्याकूळ जीव होई!
गेलीस दूर देशी सोडून पाखरांना
घारीसमान चित्ता तू ठेवणार ग्वाही!
मी घालतो गवसणी आकाश काय त्याचे?
पण पाठ थोपटाया आईच आज नाही!
जयराम धोंगडे, नांदेड (९४२२५५३३६९)
दि.३१ जानेवारी २०२३