सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार व इतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यासाठी व खावटी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा बँक सभागृहात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत दिले. आंबा बागायतदार व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व विविध विषयांवर जिल्हा बँक सभागृहात दळवी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार राणे, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्ष दिव्या वायंगणकर, शेतकरी संघटक शामसुंदर राय, गावकर, आग्नेल फर्नांडिस व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. युती सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरूनही साडेतीन हजार . शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. खावटी कर्जमाफीही झालेली नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी होऊन सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा होऊन आंबा बागायतदार व इतर शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ व्हावे व खावटी कर्जही माफ व्हावे, यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊ, असे राणे व दळवी म्हणाले.