सावंतवाडी
महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला.
सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. सावंतवाडी आंबोली रस्त्याच्या बाजुला असलेले हे देवस्थान जागृत आहेत. या रस्त्याने जाणारा प्रत्येक वाहनधारक या देवतेला नतमस्तक होऊनच पुढे रवाना होतो. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक गोवा राज्यातून दरवर्षी उत्सवाला भाविक सावंतवाडीत दाखल होतात.
यावषीर्ही उत्सवासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती.
तर देवस्थानकडून सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवावर अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद, वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भाविकांसह जिल्हाबाहेरील भाविकांनी हजेरी लावत केळी व नारळ ठेवून नवसफेड केली, दर्शनाची गर्दी दुपारनंतर अधिकच वाढत गेली त्यामुळे रात्री उशिरापर्यंत भाविकांची लांबच लांब रांग दर्शनासाठी लागली होती. यानंतर नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.