You are currently viewing जीवन कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण आरती कार्लेकर…

जीवन कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण आरती कार्लेकर…

संतोष सावंत-देसाई; स्वेच्छा निवृत्तीनिमित्त बँक ऑफ इंडिया कडून सत्कार…

वेंगुर्ले

अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीने आवाज उठवावा आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले जीवन कसे जगावे, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आरती कार्लेकर. त्यांनी घालून दिलेला आदर्श युवापिढीने पुढे न्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी झोनल मॅनेजर संतोष सावंत-देसाई यांनी येथे केले. समाजकार्य करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. परंतु आपल्या भावनांना मुरड घालून कार्लेकर यांनी बँकेसह सामाजिक स्तरावर केलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांचे हे योगदान कधी न विसरता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यवस्थापकीय अधिकारी असलेल्या कार्लेकर यांनी नुकताच स्वेच्छा निवृती घेतली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सावंत-देसाई बोलत होते.

याविषयी ते पुढे म्हणाले केवळ बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्लेकर यांनी काम केले नाही. तर त्याबरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोलाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचे योगदान न विसरता येणारे आहे. अत्यंत डॅशिंग नेतृत्व तितक्यात मनमिळावू असल्यामुळे त्याचा नेहमीच फायदा बँकेच्या कामासाठी झाला. बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून वारंवार देण्यात येणारी वेगळी उद्दिष्टे सुद्धा त्यांनी अत्यंत सहजतेने पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये, अशी आमची मागणी होती. परंतु आईचे कारण महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्या अर्जाला आम्ही मान्यता दिली आहे. त्यांनी आपले पुढील आयुष्य सामाजिक कामासाठी वाहून घ्यावे व आम्हालाही त्यात समाविष्ट करून घ्यावे असे ते म्हणावे.

यावेळी कार्लेकर यांनी आपले मत मांडले आपले प्रवास हा नेहमीच संघर्षातून निर्माण झाला. उभा राहिला रोजच्या जीवनात काम करत असताना सामाजिक काम व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केले आणि त्यात परमेश्वराने आपल्याला संधी दिली हे सुद्धा महत्त्वाचे आहे भविष्यात अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबविण्याचा आपला मानस आहे. बँकेकडून करण्यात आलेला सत्कार माझ्यासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ऑफिसर असोसिएशनचे ऋषिकेश गावडे, माजी वरिष्ठ प्रबंधक नंदकुमार प्रभूदेसाई आणि श्री. केरकर तसेच वेंगुर्ला शाखेचे वरिष्ठ प्रबंधक विजय वर्मा यांच्या हस्ते कार्लेकर यांचा सन्मान करण्यात आला.

कार्लेकर यांनी दोन वर्षात सुमारे दीड कोटींचे प्रिमियम बँकेला मिळवून दिल्याबद्दल स्टार युनियन लाईफ इन्शुरन्सतर्फे त्यांचा विशेष गौरव केला. कार्लेकर यांनी बँक ऑफ इंडियाच्या सावंतवाडी, बांदा, तळवडा, कुडाळ आणि वेंगुर्ला शाखांमधून उत्कृष्ट काम केले आहे. बँकेतील कर्ज वसुली, डिपॉझिट मोव्हिलायझेशन व २००९ नंतर इन्शुरन्समध्ये भरपूर काम करुन सर्व टार्गेट सातत्याने पूर्ण करण्याचा मान आरती कार्लेकर यांना मिळाला आहे. २००६ मध्ये बँक ऑफ इंडियाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तेव्हा विशेष बँक. कर्मचारी म्हणूनही त्यांचा सत्कार झाला होता. १० ते ६ ही आपली नोकरीची वेळ संभाळून सर्व टार्गेट पूर्ण करुन त्यांनी प्रचंड सामाजिक कार्यही केले आहे.

यावेळी वेंगुर्ला शाखेतील अधिकारी आलोक, अविनाश तसेच बँक कर्मचारी गौरव, गौरेश, अश्विनी, सद्गुरु परब, इन्शुरन्सचे इफगार पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. रमाकांत पडवळ यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच मंदाकिनी सामंत यांना महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही बँकेतर्फे सन्मान करण्यात आला. माजी कर्मचारी सतिश डुबळे, ग्राहक दिलीप सामंत, सीमा मराठे, कुटुंबियांतर्फे स्नुषा सौ.अर्पणा मंगेश कार्लेकर व मुलगी सौ. मानसी हर्षद दिक्षित यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =