पर्यटकांचे आकर्षण…आंबोली पर्यटनावर होणार परिणाम…
सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तेव्हा जिल्हा विकसित होईल आणि गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पर्यटन वाढीस लागेल, अशा अपेक्षा होत्या. गोव्यापेक्षा नितांत सुंदर असे समुद्रकिनारे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले असून आंबोली सारखे थंड हवेचे ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाक म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले नैसर्गिक सौंदर्य यामुळेच पर्यटकांचा ओढा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. देवबाग, भोगवे, तारकर्ली, वेंगुर्ला, वेळाघर,मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला आदी ठिकाणी देशी विदेशी पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नाक म्हणून ओळख असलेली आंबोली हे पर्यटन स्थळ तर पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असते.
गेले काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या पर्यटन स्थळावर असलेल्या खोल दऱ्यांमध्ये घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यात घडलेले खून आदींमधील मृतदेह टाकल्याचे निदर्शनास येत आहे. काल-परवाच कराड येथे वीट व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादातून घडलेल्या खुनाच्या घटनेतील मृतदेहाला टाकण्यासाठी सुरक्षित अशी जागा म्हणून गुन्हेगारांनी आंबोली या पर्यटन स्थळाची निवड केली. वीट व्यवसायातून कराड येथील दोघांनी पंढरपूर येथील पैसे देणे लागत असलेल्या एका व्यक्तीस उचलून आणले आणि कराड येथे डांबून ठेवले होते. परंतु जोर जबरदस्ती करूनही सदरची व्यक्ती पैसे देत नसल्याने त्याला गाडीत घालून मारहाण करण्यात आली. या मारहाणी मध्ये सदरच्या पंढरपूर येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी मारहाण करणाऱ्या दोघांनी तो मृतदेह फेकण्यासाठी आंबोली येथील खोल दरीची सुरक्षित जागा म्हणून निवड केली. परंतु रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान अंधारात गाडीच्या डिकी मध्ये असलेला मृतदेह दरीत फेकताना पाय घसरल्याने तोल जाऊन फेकणारा सुद्धा दरीत पडला, आणि त्याचाही मृत्यू झाला. सदरची घटना त्याच्यासोबत असलेल्या मित्राने त्याच्या नातेवाईकांना सांगितल्यावर खून आणि दरीत दुसरी व्यक्ती कोसळल्याची घटना उघडकीस आली. काल दरीतून दोन्ही मृतदेह बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमने वर काढले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असे थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आहे. पावसाळ्याच्या दिवसात आंबोलीच्या कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे आंबोलीचे सौंदर्य स्वर्गीय भासत असते. त्यामुळे संपूर्ण आंबोली जशी वसंतात झाडे फुलांनी बहरतात तशीच माणसांनी बहरलेली असते. अशावेळी स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो आणि खरोखरच “पर्यटनातून रोजगार” ही व्याख्या येथे खरी ठरते. पर्यटनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या समुद्रकिनारे, नैसर्गिक साधन संपत्ती, विविध प्रेक्षणीय स्थळे, देवालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला, अनेक गड, सावंतवाडी येथील लाकडी खेळण्याची बाजारपेठ आदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओढा असतो. सुंदर, शांत, निसर्गरम्य जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. परंतु अशा शांत आणि सुंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली सारख्या थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळावर घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यांमधून अनैतिक प्रकारातून किंवा व्यावसायिक वादंगातून घडलेल्या खून प्रकरणातील मृतदेह कावळेसाद, सारख्या रम्य अशा पॉईंटवर असलेल्या खोलदरीत अथवा आंबोली घाटातील दऱ्यांमध्ये फेकण्याचे प्रमाण गेली काही वर्षे वाढीस लागले आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली सारखे निसर्गरम्य पर्यटन स्थळ बदनाम होत आहे. आंबोली येथे जिल्ह्याच्या बाहेर घडणाऱ्या गुन्ह्यातील मृतदेह फेकून देखील सदरची घटना आंबोली घाटात घडली अशा प्रकारची ठळक प्रसिद्धी वर्तमानपत्रे, सोशल मीडिया, आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे आंबोली घाट म्हणजे गुन्हेगारी अशीच आंबोलीची ओळख बनत चाललेली आहे. त्यामुळे आंबोली सारख्या पर्यटन स्थळाचीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाचक्की होताना दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारच्या क्वचित घडणाऱ्या घटनांवर अतिरिक्त लक्ष वेधून घेण्यापेक्षा जिल्ह्याची आणि पर्यायाने आंबोलीची होणारी बदनामी टाळावी. जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटन वाढीस अडथळा निर्माण होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी आणि पोलीस प्रशासनाने आंबोली येथे घडणाऱ्या अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आंबोलीत येणाऱ्या बाहेरील गाड्यांची नियमित तपासणी करावी. जेणेकरून अवैद्य आणि अनैतिक घडणाऱ्या घटनांना आळा घालता येईल आणि जिल्ह्याची होणारी बदनामी सुद्धा थांबेल. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अशा विषयांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष देऊन जिल्ह्याची बदनामी कशी टाळता येईल याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.