माकडतापाच्या प्रतिबंधासाठी टिक संकलनाबरोबरच विविध उपायोजनाची अंमलबजावणी सुरु
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत तालुकानिहाय टिक सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणा दरम्यान मौजे डिगस तालुका कुडाळ या गावातील टिक केएफडी बाधित आढळून आले आहेत. सदयस्थितीत या भागात तापरुग्ण सर्व्हेक्षणा दरम्यान एकही तापरुग्ण आढळलेला नाही. तसेच माकडमृत्यु घटनेची नोंद झालेली नाही. आरोग्य विभागामार्फत संशयित केएफडी रुग्णांचे एकुण 46 रक्तजल नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था पुणे येथे तपासणी साठी पाठविणेत आलेले आहेत. तपासणी अंती एकही रुग्ण बाधित आढळून आलेला नाही. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली.
दरवर्षी माहे नोव्हेबर ते जून या कालावधीत जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यामधील काही गावामध्ये माकडताप (क्यासनूर फॉरेस्ट डिसीज) या आजाराची लागण होण्यास सुरवात होते. या बाधित भागात रुग्णवाढ अथवा साथउद्रेक उदभूव नये या सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन वरीष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच क्षेत्रिय स्तरावर संभाव्य संशयित रुग्ण शोधणे करीता नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण करणे त्याचप्रमाणे संभाव्य बाधित क्षेत्र निश्चित करण्याकरीता टिक संकलन करण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभुमीवर सदर भागात पुढीलप्रमाणे उपाययोजना राबविण्यात येत आहे.
या भागात विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण करून आढळलेल्या तापरुग्णाच्या रक्तनमुन्याची संशयित रुग्ण म्हणुन तपासणी करणेच्या सूचना संबंधित प्रा. आ. केंद्राना देण्यात आलेल्या आहेत. या भागात आढळलेल्या तापरुग्णांचे केएफडी, डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराच्या निदानासाठी रक्तजल नमुने एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविणेकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणा दरम्यान घरोघरी जावून या आजाराबाबत आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. आढळलेल्या तापरुग्णांना त्वरीत शासकिय दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी आवश्यक औषधसाठा व किटकनाशके उपलब्ध करून देण्यात आले आहेत.जंगल परीसर किंवा बागायती क्षेत्रात जाताना वैयक्तिक सुरक्षेसाठी डीएमपी तेलाचा वापर करणे. जंगल परीसर किंवा बागायती क्षेत्रात जाताना पूर्ण झाकेल असे कपडे परीधान करणे.
वनविभाग, ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग या सर्व विभागांच्या सहकार्याने व समन्वयाने सदर भागात रुग्णांत वाढ होवु या करीता सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.