You are currently viewing शालेय खेळ…आणि आठवणी..!

शालेय खेळ…आणि आठवणी..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*शालेय खेळ…आणि आठवणी..!*

 

शाळा सुटली पाटी फुटली….

आई मला भूक लागली….!

कधी एकदा शाळा सुटते आणि दफ्तर पाठीवर मारून धावत घरी जातो…जे खायला मिळेल ते तोंडात कोंबतच मैदानावर पोचतो…

हो, असेच असायचे शाळेत असतानाचे बालपणातील दिवस…! आज ते दिवस आठवले की स्वतःच मनातल्या मनात हसतो…आणि पुन्हा एकदा बालपणीच्या विश्वात हरवून जातो. शाळेतून घरी येतानाच पुढे तासभर मिळणारा मोकळा वेळ काय खेळायचं…? याची रूपरेषा डोक्यात बनवूनच घर गाठायचे. आजकाल मुलांना खेळाची ती ओढ राहिलेली दिसत नाही. मुले रडत कढत घरी येतात, सोफ्यावर अंग फेकतात आणि मोबाईलच्या विश्वात स्वतःला विसरून जातात. ना भुकेची आठवण असते ना मैदानी खेळाची ओढ…!

पूर्वी शाळेत जाण्याची सुद्धा ओढ असायची…अभ्यासासाठी नसेलही परंतु तासभर आधी शाळेत गेलो तर सवंगड्यांसोबत शाळेच्या पटांगणावर मनसोक्त खेळता येईल म्हणून…! शाळेच्या त्या दिवसातील खेळ सुद्धा मनोरंजक असायचे. आज मुलांना “दगड की पाणी” हे शब्दही आठवणार नाहीत, पण तो खेळ खेळताना सुद्धा जाम मज्जा यायची… “मी तुझ्या पाण्यामध्ये” म्हणून चिडवायची एक वेगळीच मजा मिळायची…इकडून तिकडे दगडावरुन पाण्यात म्हणजे मातीवर उतरून दुसऱ्या दगडावर आऊट न होता पोचण्यात दमछाक व्हायची…अंगातून घाम वहायचा, शरीर तंदुरुस्त रहायचं. पावसाळ्यात गुट्टीचे खेळ म्हणजे जीव की प्राण… खिशात, दफ्तरात लपवून एक गठ्ठा(मोठी गुट्टी) आणायचा, मैदानावर कोपऱ्यात एक छोटा खड्डा (गल) बनवून त्यात गुट्टी पेलायची… मग कोणावर राज्य येईल त्याला पिटाळत दूर पर्यंत न्यायचं…ती एक वेगळीच मजा होती. कधी पकडापकडी, तर कधी बिनधास्तपणे अंगावरच्या शाळेच्या कपड्यांची फिकीर न करता कबड्डी खेळायचो. अंगावरचे शाळेचे कपडे तर घरी येतानाच पूर्ण लोळलेले असायचे…एक दोन फटके भेटणार हे ठरलेलंच पण म्हणून खेळ कधीच सुटला नाही तर आवड वाढतच गेली.

आमची मिलाग्रीस शाळा म्हणजे दरवर्षी १००% निकाल आणि खेळात कबड्डी व क्रिकेटसाठी ओळखली जायची. भलं मोठं शाळेचं पटांगण आणि शाळेच्या मागील बाजूस विस्तीर्ण मळा. त्यामुळे जरी दोन तीन हजारांवर मुले शाळेत शिकत असली तरी खेळण्यासाठी कधी जागेचा प्रश्नच नसायचा. कबड्डी, क्रिकेट मध्ये तर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही शाळेचं नाव गाजत होतं. परंतु या सर्वांबरोबर लांब उडी, उंच उडी, टेबल टेनिस आदी खेळांना देखील प्रोत्साहन दिले जायचे. परंतु हे मैदानी केलं खेळात असताना आम्हाला जास्त आवड असायची ती शाळेच्या मागील मैदानावर वर्गातील मित्रांनी मिळून खेळ कबड्डी, गोट्यांचे खेळ, अगदी माडाच्या झावळीच्या पिड्या पासून बनविलेल्या बॅटने चेंडू ऐवजी गोट्यांनी क्रिकेट खेळण्याची. कमी जागेत भरपूर संघ खेळायचे, आणि पिड्याची बॅट झाडा झुडपाच्या आत लपवून ठेवता यायची, ना वर्गात न्यावी लागायची ना त्याची चोरी व्हायची. कधीतरी शाळेत घेतले जाणारे स्पर्धात्मक खेळ म्हणजे लिंबू चमचा, स्लो सायकलिंग यात तर आम्ही तरबेज. सायकल चालविण्यासाठीच जन्म घेतल्यासारखी सायकल चालवायचो, अगदी मन एकाग्र करून…! “आईचा रुमाल हरवला…तो मला सापडला…” म्हणताना बाईंचा रुमाल लाल व्हायचा… डोळ्यांवर पट्टी बांधून खेळलेली आंधळी कोशिंबीर रात्री पाठ दुखल्यावर समजायची…वाट्टेल तो पाठीवर धपाटा देऊन पळायचा… एप्रिल – मे महिना म्हणजे खेळांचे माहेरपणाचेच दिवस म्हणा. एकच नाही तर सर्वच प्रकारचे खेळ दिवसभर खेळायचो. भर उन्हात क्रिकेटचे सामने तर चार चार दिवस चालायचे. लाऊड स्पीकरवर मालवणी, मराठी, हिंदी, इंग्रजी अगदी सर्व भाषेत कॉमेंटरी सांगायचो. हर्षा भोगले सुद्धा आमच्या मैदानावरील कॉमेंटरीने बेशुद्ध पडला असता. अशी दणकेबाज कमेंटरी असायची. पावसाळ्यात चिखलात शेतात खेळला जाणारा आमचा फुटबॉल सामना म्हणजे चिखलात फुललेल्या कमळाला देखील चिखल नसतो परंतु खेळून तेवढा चिखल आमच्या अंगावर असायचा. कपडे तर घरचे बेवारश्या सारखे फेकून द्यायचे. शनिवार, रविवार आम्ही जेवणासाठी घरी नक्की मुक्काम पोष्ट आमचा मैदानावरच…!

मे महिन्याच्या सुट्टी आम्ही बाजारपेठेत कुठे सिगारेट ओढून फेकलेली पाकिटे मिळतात का? हे शोधत फिरायचो. सिगारेट बद्दल जास्त माहिती नसायची पण त्या पाकिटांनी खेळ खेळतात म्हणून जमविण्याचा छंद. काजूच्या दिवसात काजू एका रांगेत लावून त्यांना मोठ्या काजूने (भट्टा) नेम काढून ठोकून लाईनच्या बाहेर जी काजू जाईल त्या पुढील सर्व काजू आपल्या असा मजेशीर खेळ खेळला जायचा. जास्त काजू जमल्या की विकून येणाऱ्या पैशात एखादा ऑमलेट पाव हॉटेलमधून घ्यायचा आणि वाटून खायचा हीच आमची पार्टी…!

आज ज्या आंबा, काजूच्या झाडावर चढू शकत नाही त्याच झाडांवर त्यावेळी बालपणी सुरपारंब्या खेळताना माकडासारखे चढायचो…अगदी उड्या मारत झाडावर खाली उतरायची. पडण्याची भीती नव्हती आणि स्वतःवर असलेला प्रचंड विश्वास बळ द्यायचा. वडाच्या झाडाच्या पारंब्या तर गगनाला हात टेकवून आणायच्या. आज झोका घेताना कोणीच दिसत नाहीत, तर ते वड सुद्धा मुला बाळांच्या विना पोरके झाले आहेत. रात्र सुद्धा खेळातच जायची. घरात टिव्ही नसायची आणि असली तरी चित्रहार, छायागित संपलं की आम्ही मोकळेच, मग डाव सुरू व्हायचे ते पत्त्यांचे…! मेंडिकोट हा आवडता खेळ, नाहीतर मग गाढव गाढव, पाच तीन दोन तर कधी गुलाम चोर. त्यातही फसवाफसवी, हातचलाखी करताना मज्जा यायची. पण सर्व खेळीमेळीने खेळायचे, खेळाचा आनंद घ्यायचे. केवळ आनंद घेणे हाच उद्देश…! चोर पोलिस हा चिठ्ठ्या टाकून खेळला जाणारा खेळ म्हणजे खरोखरच चोर किंवा पोलिस असल्याचं फील यायचं. कित्येकदा सारवलेल्या खळ्यातील मांडवात पत्त्यांचे डाव जोरदार रंगायचे. पांगेरा झाडाच्या बियांनी देखील बैठा खेळ खेळला जायचा. बिया हवेत उडवून जमिनीवरील जमतील तेवढ्या बिया त्याच हाताने जमवायच्या आणि उडवलेली बी देखील हातात झेलायची. मध्येच कोणीतरी त्यातील एक बी जमिनीवर घासून अंगाला चटका द्यायचा. तेव्हा तो चटका देखील अंग भाजून काढायचा. पण त्यातही मज्जा यायची. कधी कधी लंगडीने सुद्धा खेळायचो. जोरात लंगडी घालून पकडायला मजा यायची.

कॅरम वगैरे घेण्याची ऐपती कुणाची असायची? म्हणून बिन खर्चाचे खेळ आपलेसे वाटायचे. लपाछपीचा खेळ तर सस्पेन्स असायचा. कधी कोण धप्पा देईल समजायचं नाही. समुद्रावर पांढऱ्या शुभ्र वाळूत कितीदा वाळूशिल्प कोरली आणि कितीदा त्यांचे लाटांनी विसर्जन केलं याला तर मोजमाप नाही…कधीतरी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रेमाचं चिन्ह काढून लिहून ठेवायचं अन् लाटांनी निर्दयपणे ते पुसून टाकायचं हा भावनांचा लाटांचा आणि आमचा खेळ तर नित्याचाच व्हायचा…! नदीत उंचावरून सुर मारून पोहण्याची शर्यत….समुद्राच्या लाटांचा मारा झेलत खोलवर पोहत जाणे हे साहसी खेळ आयुष्यात निडरपणे जगण्याचा धडा देणारेच…!

आज अंगाला ऊर्जा देणारे, आयुष्य निरोगी जगायला शिकववणारे, सर्वांगाला व्यायाम देणारे साहसी, स्पर्धात्मक खेळ मुले खेळताना दिसत नाहीत…विज्ञानाने प्रगती केली, मोबाईल क्रांती झाली आणि मैदानी खेळांनी मात्र कात टाकली…कोवळ्या मुलांमध्ये पूर्वीच्या म्हाताऱ्यांनाही न जडणारे रोग दिसू लागले. आज मैदाने ओस पडली, पोहायला शिकवणारी स्विमिंग पूल तयार झाली…खेळ पैशांचे झाले…मैदानांवर मुलांच्या पावलांनी उडणारी धूळ उसळताना दिसत नाही, उडालीच तर कधीतरी सोसाट्याच्या वाऱ्याने किंवा वादळाने…मैदाने आजही खेळणाऱ्या पावलांची वाट पाहतात… मुलं घरातच मोबाईल वर आनंद शोधतात अन् मैदानी खेळातून आनंद मात्र हद्दपार झाला…तो कायमचाच…!

 

©[दीपी]

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − four =