*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*
*देव मंदिरातला*
देवाची मूळ व्याख्या कोण सांगू शकतो, जो देवाच्या भक्तीत विलीन झाला आहे, ज्याने स्वतःच स्वतःचे आयुष्य नामस्मरणात वाहून घेतले आहे जसे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, वा सर्वच संत मंडळी हो ना? आजही त्यांनी लिहिलेले अभंग, ओव्या, गीते, काव्य प्रसिद्ध आहेत शिवाय लोकांच्या वाचनात आहे. इतकंच काय ब्राम्हण पंतांच्या, “संस्कृत शिकण्याचा अधिकार एका सामान्य व्यक्तीला नसून केवळ ब्राम्हण, क्षुद्र, क्षत्रिय यांनाच आहे तेव्हा ताबडतोब तुम्हाला तुम्ही रचलेले अभंग, गाथा, पुराण पाण्यात सोडाव्या लागतील.” सांगण्यावरून संत तुकारामांनी आपल्या गाथा, अभंग इंद्रायणी नदीच्या पाण्यात सोडून दिल्या तरी आजही त्यांचे अभंग, कीर्तन लोकांच्या ओठी वसले आहे. काही जुन्या लोकांना तर अगदी तोंडपाठ आहेत. या संत महात्म्यांनी त्यांच्या लेखणीतून देवाविषयी असलेला भाव, मनी असलेली श्रद्धा जागृत ठेवून देवाची निस्सीम भक्ती केली. परंतु त्यांची देवाविषयी असलेली आत्मीयता, सगुण भक्ती, देवाच्या भेटीची ओढ, तळमळ, विचारांची कळकळ, जागरूकता, कृतज्ञताही थेट पंढरपूरच्या विठुरायापर्यंत पोहोचली.
आपण ही माणसामाणसात, देव्हाऱ्यात, राऊळात, स्वतःच्या अंतरंगात ही विठ्ठल शोधतो. आज बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरात देव्हारा आहे. देव्हाऱ्यातील देव आपण श्रद्धा, भान ठेवून पुजतो. देवाविषयी असलेली भावना, संस्कार जो तो त्याच्या परिने देवासमोर मांडतो, देवाला गाऱ्हाणे घालतो अगदी मनोभावे भक्ती करतो. देवाविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. ते वाईट नाही चांगलेच आहे; पण आपण देवाला भेटायला मंदिरात किती वेळा जातो याचे उत्तर आहे कोणाकडे? मान्य आहे देव सगळीकडे आहे देव मंदिरात आहे, देव माणसात आहे, देव देव्हाऱ्यात आहे आपण पांडुरंगाला ज्यात शुद्ध मनाने पाहू त्यात आपल्याला तो दिसतो. पण मला एक सांगा दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक आषाढ महिन्यात एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन जातात. विठ्ठलाशी नाते जोडतात. तीही आपल्यासारखीच सामान्य माणसे आहेत ना? त्यांना ही आपल्यासारखीच मने आहेत, भाव आहेत, पण ते कितीही ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाची ही पर्वा न करता स्वतःस, आपल्या कुटुंबास काही काळ विसरून फक्त देवाच्या चरणी लीन होण्यास जातात. आपण कधीतरी जातो का? कामाच्या गडबडीत, सुखी संसारातून वेळ मिळत नसल्यामुळे, मुलांचे शिक्षण, आजारपण आपले अर्धे आयुष्य यातच जाते कधी जाणार मग त्या सावळ्या पंढरपूर निवासी विठुरायाच्या दर्शनाला हो ना?….
अहो, पण किती दिवस तुम्ही देव्हाऱ्यात विठुरायाला बघणार किती दिवस त्याच्या भेटीच्या आशेकडे डोळे लावून बसणार मग आपल्या दैनंदिन कामांमधूनच नाही का त्याच्यासाठी आपण वेळ काढू शकत? नाही का त्याला भेटण्यासाठी मंदिरात जाऊ शकत? तुम्हाला जर भरल्या डोळ्यांनी, हृदयाच्या अंतःकरणातून, त्याचे भावविश्व, सौंदर्य, निरुपमय साधना, पाहायचे असेल ना, तर आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जावे लागेल. आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातून सुटकेचा निःश्वास सोडण्यासाठी विठुरायाला जाऊन भेटावे लागेल. तुम्ही नाही पंढरपूरला जाऊ शकत पण आपल्या घराच्या जवळच्या मंदिरात तर नक्कीच जाऊ शकता ना! मान्य आहे नाही जमत आठवड्यातून जायला, नाही जमत महिन्यातून एकदा जायला पण निदान येणाऱ्या प्रत्येक दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, इतकेच नव्हे तर दर संकष्टी चतुर्थीला, दत्त जयंती, श्रावणी सोमवार, शनी जयंती, हनुमान जयंती, महाशिवरात्र, नवरात्र, गणपती किंवा शुभकाऱ्याची सुरुवात करायची असल्यास तर तुम्ही जाणे आवश्यकच आहे. कारण सगळीकडे देव जरी सारखा असला तरी त्याची येणारी प्रचिती ही प्रत्येक ठिकाणची वेगवेगळ्या स्वरूपाची असते हे कायम लक्षात असू द्या.
मंदिरात जायचे म्हणजे मजा म्हणून फिरायला मिळते म्हणून नव्हे तर तुम्ही एकदा फक्त देवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाय ठेवून बघा तुम्हाला वेगळेच चैतन्य जाणवेल. एक नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी अंगात संचारते. संकटांशी सामना करण्यास बळ मिळते. जगण्याची नवी ताकद, ऊर्जा शरीरात निर्माण होते. बाकी इतर घरातील, बाहेरचे विचार दूर सारून मन शुद्ध होते. आणि फक्त देवाचे नामस्मरण पचनी पडू लागते. विचार शुद्ध होतात. तसेच देवाच्या डोळ्यात साठलेले मूर्तीचे अतिसुंदर, विलोभनीय, शृंगारिक सौंदर्य, बोलके डोळे, चेहऱ्यावरील हावभाव, त्या मूर्तीची पारदर्शकता, मूर्तिमंत रूप डोळे आपले दिपून घेतात. त्या मूर्तीकडे आपले लक्ष वेधित होते, मन आकर्षित होते असे वाटते जणू आपला जन्म देवाच्या भेटीसाठी आणि निस्वार्थी सेवेसाठी झाला आहे. एकदा का मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तो आजूबाजूचा परिसर, निसर्गरम्य वातावरण मन अगदी चित्तारून टाकते, आपल्याला आपल्या घरादरापासून, माणसांपासून जणू वंचित करून टाकतो. देवाविषयीची आपराधनतेची भावना जागृत होते. जिथे बघावे तिथे मंदिराच्या भिंतींभिंतींमध्ये हरी नामाचा स्वर ऐकू येतो. नामजप, कीर्तन, भजन, अभंग यांचे अक्षरशः ध्वनीकंप निर्माण होतात त्यात जर मंदिरात भजन चालू असले तर काय विचारता सोय नाही इतके ताजेतवाने वाटते. जसा आपल्याला जागीच मोक्ष प्राप्त व्हावा.
भान उरले ना देहाचे का कशाचे
स्वर रूतले कानाशी नामस्मरणाचे
होय. अगदी तशीच अनुभूती आपल्याला मंदिरात गेल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. मग संस्कारक्षम, कार्यक्षम युक्तीवाद अंगी संचारून सद्सद्विवेकबुध्दीने चपळ हालचालींना ही वेग येतो. आचरण शुद्ध होते. मोहमाया, पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्यापासून सुद्धा काही काळ आपण दूर राहतो. कलुशित मने देखील प्रफुल्लित होऊन रमणीय दैवी साधनेत परावर्तित होतात. याउलट वासनांध मनुष्य कोणी यदाकदाचित मंदिरात गेला तरी त्याचे देवाच्या भक्तिमय भावाने, देवाच्या सन्मुख दर्शनाने, सुस्वरूप गंधाने मानसिक आरोग्य स्थिर होते. शिवाय आत्मा ही संतुष्ट होतो. दुसरी गोष्ट मंदिरातील शेष आरती, ब्रम्ह मुहूर्ताच्या आरतीला तुम्हाला उपस्थित राहता येत असेल तर अतिउत्तम. पण आलेली संधी मुळीच सोडू नका. कारण आरतीच्या वेळी वाजणाऱ्या नगाऱ्यातून ध्वनिकंप निर्माण होणारा सुरेल नादब्रह्म स्वर कानाला आणि मनाला अधिक आनंद देणारा असतो. आपण घरात देव्हाऱ्यातल्या देवाची आरती करतो पण त्यातून जितके सुख मिळते त्यापेक्षाही मंदिरात जाऊन आरती केल्याने अधिक मिळते, कारण तेथील माणसाच्या मनावर आणि शरीरावर पडणारा प्रभाव सामायिक आत्मबोधात्मक असतो. तेव्हा घरातील देव्हाऱ्यातल्या देवाचे पावित्र्य राखता राखता दर वर्षाच्या प्रत्येक सणासुदीला देवाच्या मंदिराला आपले पाय लागू द्या. आणि स्वयंप्रकाशित व्हा. हेच माझे सांगणे.
लेखक : नयन धारणकर,नाशिक©®