मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने ३-० या फरकाने ही मालिका जिंकली पण आज टी२० मालिकेतला पहिला सामना न्यूझीलंडने २१ धावांनी जिंकून १-० अशी आघाडी घेतली.
रांची येथे भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. परंतु भारताच्या वेगवान गोलंदाजांपुढे ते धावा करण्यात यशस्वी ठरले. डॅरिल मिशेल (५९*) आणि डेव्हॉन कॉनवे (५२) यांच्या अर्धशतकांनी आणि फिन ऍलनच्या (३५) सुरुवातीच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने १७६/६ धावांपर्यंत मजल मारली. वॉशिंग्टन सुंदरने २२/२, कुलदीप यादव, शिवम मावी आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
१७७ धावांचं लक्ष गाठताना भारताची सुरूवात १५/३ अशी झाली. सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी डावाची सूत्रं हातात घेत ६८ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादव (४७) धावांवर सोढीच्या हाती चेंडू देऊन तंबूत परतला. वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने पंड्याने पुन्हा मोठी भागीदारी रचण्याची गरज असताना पंड्या (२१) धावांवर ब्रेसवेलचा बळी ठरला. वॉशिंग्टन सुंदरने एका बाजूने किल्ला लढवला पण समोरून नियमित अंतराने गडी बाद होत राहिले. त्याने २८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ५० धावा काढल्या आणि बाद झाला. भारताच्या दोन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर अर्शदीप सिंह ६ चेंडू खेळूनही ० धावांवर नाबाद होता तर उमरान मलिकने एका चेंडूंत चौकार मारत त्याचा स्ट्राईक रेट ४०० वर नेला. २०व्या षटकाच्या अखेरीस भारताने १५५/९ इतकीच मजल मारली आणि न्यूझीलंडने हा सामना २१ धावांनी जिंकला.
डॅरिल मिशेलला (५९*) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. टी२० मालिकेतला दुसरा सामना २९ जानेवारी रोजी रांची येथे होणार आहे. भारत पलटवार करणार की न्यूझीलंड ह्या सामन्यासह विजयी आघाडी घेणार हे भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम ह्या उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील क्रिकेट स्टेडियमवर समजणार आहे. ५०हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या ह्या मैदानावर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये खेळवला गेला होता.