You are currently viewing हरवलेले बालपण
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

हरवलेले बालपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम लेख*

*हरवलेले बालपण*

आताच्या तारुण्य वयात जरा बालपणात वळून बघितले असता आपण बऱ्याच वर्षाचा काळ लोटून पुढे आलो आहोत असे वाटते. सध्याच्या मुलांचे बालपण बघता हवे तसे बालपण सध्याच्या मुलांना जगायला मिळत नाही किंबहुना बालपण अनुभवयास मिळत नाही असे निदर्शनास येते. काय दिवस होते ते बालपणातील….. विसरू ही शकत नाही. ते बाल्यावस्थेतील जीवन म्हणजे आजही मनावर कोरलेले शिल्प अथवा एक कधीही संपुष्टात न येणारा मजबूत खजिनाच जणू. ते दिवस आठवले की पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. सध्याची मुले बालपण म्हणजे काय हेच विसरून गेलेत.


पूर्वीचे बालपण म्हणजे एकदम सुखात हसत खेळत जगण्याचे दिवस होत. रोज सकाळची शाळा सुटली की कधी एकदा घरी जाऊन खेळायला जाऊ असे व्हायचे. आठवड्याचा रविवार असला किंवा शाळेला सण वाराची सुट्टी असली की आमचे खेळ सकाळी सकाळी सुरू व्हायचे ते थेट रात्रीच संपायचे. मग त्यात आबाधोबी, लिंगोरचा, लपंडाव, विष अमृत, डोंगराला आग लागली, कुस्ती, पकडापकडी, डबा डिमदिम, कांदा फोडी, हत्तीची सोंड यासोबतच दुपारचे ऊन असले की कॅरम, चल्लस, काचा पाणी, सागर गोटी यासारख्या बैठी खेळांना सुरुवात होत. संध्याकाळ झाली की पुन्हा क्रिकेट, फुटबॉल, खो खो, कबड्डी असे अस्सल मातीतले खेळ सुरू व्हायचे. पार घरातल्यांनी आवाज देईपर्यंत आमचे खेळ काही थांबेना. याही पेक्षा कुठे घरांचे बांधकाम चालू असले की तिथे मग वाळूत जाऊन याला पाड त्याला पाड खेळत बसायचं, त्यात पावसाचे दिवस आले की मग तर त्या मातीच्या सुगंधाने मातीत खेळायला आणखीनच जोर वाढत असे.


आता अस्सल पारंपरिक खेळांना गणतीच राहिलेली नाही आबाधोबी, लिंगोरचा, लपंडाव, विष अमृत, डोंगराला आग लागली, कुस्ती, पकडापकडी, डबा डिमदिम, कांदा फोडी, हत्तीची सोंड हे असे गावाकडचे खेळ खेळांमध्ये गणलेच जात नाही. कुठेही या खेळांचा जराही वावर दिसत नाही. बैठी खेळांमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ सोडले तर बाकी खेळ कुठेही बघावयास मिळत नाही. कुठे हरवले हे बालपणातील सर्व खेळ आणि कुठे हरवले या लहान मुलांचे बालपण. बालपणातील खेळीविना आताची सर्व मुले पोरके झाली. मुलांना खेळायचे म्हटले की फक्त क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी इतकंच आठवतं, तेही शाळेत क्रीडा स्पर्धांच्या वेळी. इतर वेळी त्या खेळांना ही कोणी विचारत नाही. आताचे खेळ म्हणजे प्रत्येक खेळासाठी पैसे मोजावे लागतात आणि ऑनलाईन पद्धतीमुळे तर मुलांचे खेळ वाढीव खर्चिक बाब झाली.
याला कारण म्हणजे मुलांना खेळायला मैदाने शिल्लक राहिली नाहीत. आसपासच्या खेड्यात गावात खेळले जात असतील असे गावातील खेळ पण त्याची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच. तिथेही औद्योगिकीकरण सुरू झाले. जिथे बघावे तिथे घरांचे बांधकाम, मोठमोठ्या इमारती, कंपन्या, मोबाईल टॉवर्स उभारण्याचे काम चालू आहेत. मुलांच्या खेळण्याच्या जागा सर्व बिल्डिंग आणि प्लॉटस् मध्ये विकल्या गेल्यात. आणि या सगळ्याला सर्वप्रथम मारक आहे ती आजकाल वाढत चाललेली लोकसंख्या.


होय. ही लोकसंख्येची वाढीव घनता या सगळ्यांना कारणीभूत आहे. लोकसंख्या रोज कलेकलेने वाढतच चालली आहे. रोज दिवसाला हजार पार मुल जन्माला येतात. आणि पिढ्या वर पिढ्या वाढत जातात. या सगळ्याला तारतम्य असे काही राहिलेच नाही. कारण शहरातील आणि गावातील काही गाव ही आलेच यात गावात पोहोचायला रस्ते नाहीत पण गाड्या अमाप आहेत तिथे होणारी गर्दी चार कोस दूरपर्यंत असते. गाड्या वाढल्या म्हणजे साधं मुलांना इमारतीच्या आवारात खेळायचे म्हटलं तरी लोकांच्या गाड्यांच्या काचा फुटण्याची भीती. लोक ही मुलांच्या खेळांना प्रोत्साहन देण्यास कसूर करतात. कारण लोकांनाही आपले आर्थिक नुकसान होण्याची भीती. लोकांचे आर्थिक नुकसान वाचवण्यासाठी लोक त्यांच्या मुलांचे बालपण आज दडपणाखाली आणत आहेत. मुलांमधील कौशल्य, आणि शारिरीक विकास जणू मंदावला आहे. बरं, मुले कुठे मैदानात खेळायला गेली तरी काही दिवसांनी ती जागा ही जाणारच असते. तिथे पुन्हा मॉल्स, टॉवर्स, बिल्डिंग उभारणार असतात. म्हणजे मुलांना तिथे खेळण्याचे सुख हे काही दिवसांपुरतेच मर्यादित असते.
दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या पालकांना आपल्या मुलांना या महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांविषयी अथवा साधा ऐतिहासिक गोष्टी सांगायला ही वेळ नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो. मग मुलांनी फावल्या वेळात करावे तरी काय. मग तेही आपल्या सारखे घेऊन बसतात मोबाईल तासनतास, दिवस रात्र त्यावर गेम खेळत. कारण मुलांकडे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर यासारखी उपकरणे च त्यांचे करमणुकीचे साधन बनले आहे. तेव्हा आपण तिथेही रोखू शकत नाही. आपण रोखले तरी त्याचा काही फायदा होतो असे मला वाटत नाही. आजकाल तर नवजात मुलांना ही मोबाईल आणि ऑनलाइनचे वेड लागले आहे. कारण हे युग आहे नव तंत्रज्ञानाचे, हे युग आहे ऑनलाईन प्रणालीचे. असो. निदान ही मुले व इथून पुढे येणारी पिढी या नव तंत्रज्ञानासोबत पुढे जातील. याउलट हे नव तंत्रज्ञान आपल्या मुलांना पुढे घेऊन जाईल अशी आशा धरू.
यात दोष कोणाचाच नाही आपला भारत प्रगतीशील होत चालला आहे भारत स्मार्ट इंडिया होण्याच्या मार्गावर आहे या औद्योगिकीकरण, समाजकारण, राजकारण, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, या सारख्या विविध तसेच आदी क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. शिवाय आताची पिढी व इथून पुढे येणारी प्रत्येक पिढी सुद्धा याच मार्गाने जाणार याची खात्री आहे. परंतु या सगळ्यात आपले भारतीय, महाराष्ट्रीयन, गावाकडील पारंपरिक खेळ मागे पडणार याचीच मोठी खंत आहे.
पण कुठेतरी ऑनलाइन खेळा बरोबरच पारंपारिक खेळांना ही रोजच्या खेळात प्राधान्य द्यावे असे पदोपदी वाटते. मान्य आहे ते खेळ पूर्वीसारखे खेळले जात नाहीत यापुढे तर येणाऱ्या काळात या सर्व खेळांचे नामोनिशाण मिटणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी सुद्धा सर्व पालकांनी आपल्या मुलांना या सर्व खेळांची माहिती असावी या अर्थाने तरी ओळख करून द्यावी आणि या सर्व खेळांचा इतिहास पिढ्यानपिढ्या पोहोचत रहावा हीच अपेक्षा. जेणेकरून आपल्या मुलांना पारंपारिक खेळांबद्दल माहिती होईल.
पण ही जगतातील परिस्थिती अशी असताना मुलांचे बालपण हरवले असताना सुद्धा आज प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते. आणि प्रत्येकाला वाटत असत की आपण पुन्हा एकदा लहान व्हावं. कारण लहानपणात जी मजा आहे ती मोठेपणात नाही. लहानपणी जो खोडकरपणा, मस्तीखोरपणा अंगी मुरलेला असतो तो इतरत्र वावरताना दिसतोच दिसतो.
म्हणून तर संत तुकारामांनी त्यांच्या एका अभंगात म्हटले आहे.

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार

खरेच आपण कितीही मोठे झालो तरी अंगातला खोडसाळपणा, आणि मस्तीखोरपणा काही जात नाही. जसं चित्याची खोड मेल्याशिवाय राहत नाही तर हे असं. हो ना?

लेखक : नयन धारणकर,नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा