You are currently viewing कुटुंब संस्था धोक्यात आहे का…?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

कुटुंब संस्था धोक्यात आहे का…?

⁹*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*कुटुंब संस्था धोक्यात आहे का…?*

कुटुंब संस्था भारतीय मुलसंस्कृतीचा आधारस्तंभ… समाजाचा, भारतीय संस्कृतीचा कणाच..!
कुटुंब संस्था म्हणजे संस्कृतीचे प्रतिक…!
जगातील अनेक प्रगत देशांमध्ये कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे, परंतु आजही भारतात बऱ्याच प्रमाणात कुटुंब व्यवस्था सुस्थितीत असल्याचे दिसून येते, आणि याला कारण म्हणजे भारताची बहुतांश लोकसंख्या खेडोपाडी विखुरलेली आहे. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली, भारत विकसित झाला आणि होतो आहे…हातपाय पसरतो आहे… शहरीकरणाने वेग घेतला आहे. परंतु केवळ शहरे विकसित न होता गावं देखील सुधारत आहेत… वाडीवाडी, वस्त्यांवर विकासाची गंगा पोहचते आहे. त्यामुळे गाव सुधारले, शैक्षणिक प्रगती साधली गेली. वाचन, चिंतन, मननातून आणि कोरोना सारख्या संकटामुळे लोकांना एकजुटीचे, कुटुंबाचे महत्त्व समजू लागले. त्यामुळे शहरातील छोट्या खोल्यांमध्ये विखुरलेली कुटुंब पद्धती अजूनही खेड्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात शाबूत राहिली आहे.
पुरातन काळापासून कुटुंब व्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा मजबूत पाया, भारतीय समाजाचा घटक आहे. हळूहळू हीच कुटुंब व्यवस्था भारतीय सुधारित समाजासाठी आदर्शवत ठरत गेली, सामाजिक अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनली. लग्न सोहळे, समारंभ आदींपासून कुटुंब एकमेकांशी जोडली गेली आणि पुढे जाऊन समाज व्यवस्था वाढीस लागली. आज भलेही सामाजिक विकृतीमध्ये लोक भरकटले गेले, थोडा स्मृतिभ्रंश झाला किंवा ग्लानी आली तरी आदर्श कुटुंब व्यवस्था लोक अजूनही विसरले नाहीत तर जपण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून तर कुटुंब व्यवस्थेला भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका पिढीला दुसऱ्या पिढीशी संस्कारातून जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम कुटुंब व्यवस्था पद्धती करते. आपल्या रोजच्या व्यवहारांमधून आयुष्याचे नवनवे धडे देण्याचे, सत्कृत्याची सवय लावण्याचे, आपले परके नात्यांची ओळख देण्याचे, कुटुंब आचार विचारांनी एकत्र बांधून ठेवण्याचे काम कुटुंब व्यवस्था करते. कुटुंबातील संस्कारांमुळे तर आपण “मी” पासून “आम्ही” आणि “अहम् पासून “वयम्” पर्यंतचे सुसंस्कार अंगिकारले. पूर्वीपासूनच एकत्र कुटुंब पद्धती भारतात अस्तित्वात होती. एक मोठं घर, त्यात सख्खे, चुलत सर्व भावंडे आपापल्या खोलीत परंतु एकत्र रहायची. आजी आजोबा, काका, काकी, आत्या सर्व नाती जपली जायची. मोठमोठ्या नोकऱ्या नव्हत्या, पैसा गरजे पुरताच पण मने विशाल असायची. शेतीवाडी, बाग बागायती, जेवण खाणे, सण सोहळे, सुख दुःख सर्व काही एकत्रच वाटून घ्यायचे. एकमेकांना आधार द्यायचे. संकटात धावून जायचे. पिढ्यानिढ्या एकत्र राहून सर्व उत्सव, सण, सोहळे साजरे करायचे… खाणे पिणे, छान आनंदी आयुष्य जगले.
एकीकडे भारत देशाने शैक्षणिक, आर्थिक प्रगती, विकास साधल्यावर काही प्रमाणात लोकांची मानसिकता देखील बदलत गेली. लोक सुशिक्षित, सुसंस्कृत झाले, त्याचबरोबर आधुनिकतेचे खूळ म्हणा किंवा वेड लोकांच्या डोक्यात भरले. नोकरी, व्यवसायात प्रगती साधून यशस्वी झाले. “हम दो हमारे दो” या सरकारी “घोषवाक्या” सारखेच वागू लागले. पायांना चाके लावून पैशांच्या मागे धावू लागले. घर, कुटुंब यापेक्षाही महत्त्वाचा पैसा बनला त्यामुळे भावभावना बेवारस झाल्या…हृदयातील ओल सुकल्याने प्रेमाचे नवे अंकुर फुटण्याचे दिवस सरले…माणूस रोबोट, मशिनसारखा काम करू लागला. नाती गोती, सगेसोयरे दूर झाले आणि मोबाईल, कॉम्प्युटर, टिव्ही, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर सारखे निर्जीव मित्र आयुष्यात जवळचे वाटू लागले. समाजाकडे, कुटुंबाकडे पाहण्याचा माणसांचा दृष्टिकोन बदलला. सकाळी न्याहारीत भाजी, भाकरी, पेज…जेवणात डाळ, भात, आमटीची जागा पिझ्झा, बर्गर, मॅगी, न्यूडल्सने हिसकावून घेतली. पाश्चात्त्य संस्कृती आपलीशी, जवळची, आवडीची वाटू लागली. कुटुंब प्रमुखांचाच घरात विसंवाद वाढताना दिसू लागला. व्यक्ती आत्मकेंद्रित झालेली पहायला मिळू लागली. मुलामुलींकडे पालकांचा दुर्लक्ष होऊ लागला. परिणामी मुले, मुली मित्र मैत्रिणींमध्ये रमू लागली. काहीवेळा भावनेच्या भुकेल्या असलेल्या मुख्यत्वे मुली “लव्ह जिहाद” सारख्या अप्रिय, अमानुष घटनांच्या बळी पडू लागल्या. अशावेळी मुलांना केवळ चैनीच्या वस्तू, खेळणी, खायला पैसे, मोबाईल, गाड्या अशा सुखसोई दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही तर मुलांना गरज असते ती पालकांच्या सहवासाची, त्यांना भेटवस्तू नको असते तर पालकांची भेट हवी असते, आणि कामाच्या व्यस्ततेत, सोशल आयुष्य जगताना पालक हीच कमी पूर्ण करत नाहीत. लहानपणा पासूनच पाळणाघर हे दुसरं घर निर्माण झालेली मुले कुटुंबापासून दुरावतात. रात्र रात्र बाहेर पार्ट्या करू लागतात, व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे कुटुंबे उध्वस्त होतात. मुलं देखील पाश्चात्त्य संस्कृती आपलीशी करतात… पाश्चात्त्य जीवनशैली अंगिकारून आयुष्याची वाट लावून घेतात.
माझा मुलगा खूप शिकून परदेशात गेला पाहिजे, त्याचे उत्तम करियर घडून समाजात नाव मोठे झाले पाहिजे ही मानसिकता आज समाजात रुजत आहे. शहरातील तीन/चार माणसांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा शिकून अमेरिकेत जातो, स्थिरावतो… पाश्चात्त्य शैलीचा पगडा त्याच्यावर पडतो. आपला मुलगा अमेरिकेत आहे असं सांगणारे आई वडील शेवटी एकाकी पडतात. उतार वयात जगण्याचा आधार परदेशात असतो आणि म्हातारपणी अन्न ताटात वाढायला देखील कोणी उरत नाही… कि मृत्यूनंतर अग्नी द्यायलाही कोणी नसतं. अशी आज सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. तेव्हा बदलणाऱ्या या युगाकडे अचंबित होऊन पाहण्या खेरीज आपल्याकडे काहीच उरत नाही.
बदलत चाललेली लग्न संकल्पना देखील कुटुंब व्यवस्था जर्जर बनण्यास कारणीभूत ठरत आहे. पाहुणे रावळे एकत्र येत पूर्वी लग्न जमविली जात होती, ठराव होत होते… मुला मुलींची पसंती दुय्यम समजली तरी घर सांभाळणारी मुलगी आणि मुलीला सुखी ठेवणारा कुटुंबवत्सल मुलगा, चांगलं कुटुंब, खाते पिते घर एवढ्याच माफक अपेक्षा ठेऊन लग्न जमविली जात होती. आजकाल न पाहता, सोशल मीडियावर देखील अश्लील संदेशातून ओळखी होतात, प्रेमाच्या जाळ्यात फसवले जाते…एखादी भेट घडते आणि पळून लग्न केले जाते…तर कुठे काही दिवसांची ओळख, नट्टापट्टा केलेला चकचकीत चेहरा, फॅशनेबल कपडे, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हायफाय गाडी, राहणीमान असलेला मुलगा पाहून लग्न केली जातात. आई वडील, समाजाला दुय्यम स्थान देतात. अशी लग्न क्वचितच टिकतात, शक्यतो पटत नसल्याने, राहण्याच्या सवयी, मौजमजेचे छंदी आयुष्य जगण्याच्या इच्छा, इत्यादी नाना प्रकारच्या कारणांमुळे काहीच दिवसात ही लग्न तुटतात. पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबातील सोहळा, दोन कुटुंबाचे एकत्र येण्याचे साधन होते, आज मुलगा मुलगी कधी एक होतात आणि कधी विभक्त होतात हे देखील समजून येत नाही. लग्नाच्या या बदलत्या संकल्पनांमुळे कुटुंबे एक होण्यापेक्षा कुटुंब व्यवस्थाच पार कोलमडून गेली.
देश बदलतो आहे…विकास होत आहे…!
खरंय, परंतु म्हणून आपली कुटुंब व्यवस्था पाश्चिमात्त्य देशांच्या कुटुंब व्यवस्थे बरोबर स्पर्धेत उतरावी असे मुळीच नाही. आजही वेळ गेलेली नाही. सुसंस्कृत संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याची आज आवश्यकता आहे. कुटुंबाला वेळ देणे, याचबरोबर “आजी – आजोबा” या नात्याला प्रत्येक घराने जोपासणे आवश्यक बनले आहे. घराचा मूळ पाया असणारे हे नातेच जमीनदोस्त केल्यावर घराच्या भिंती कशा काय उभ्या राहणार? घराचा हाच पाया खंबीर उभा ठेवला तर नक्कीच मुलांवर पाळणाघरातील नव्हे तर आपल्या घराण्याचे संस्कार होतील. मुलांना नात्यांची ओळख होईल, जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल. पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण आपोआप थोपवले जाईल. विज्ञानाच्या युगात नवनवे बदल झाले आहेत ते सोशल मीडिया कोणत्या कारणांसाठी वापरले पाहिजे याची पायाभूत माहिती मुलांना मिळेल, आणि संस्काराविना बिघडत चाललेली पिढी योग्य मार्गावर येईल. आजी आजोबांसहित आई वडील मुले एकत्र बसून जेवू लागली की, विचारांचं शिंपण होईल, त्यातून सुदृढ, सशक्त मुले घडतील….आणि गोड गोमटी फळे धरू लागतील. आपले वडील देखील प्रेमळ आहेत यांची मुलांना खात्री पटेल, आईच्या हातच्या डाळ भाताची गोडी लागेल… घरच्या रुचकर जेवणाची चव आपोआपच वाढत जाईल…आणि पुन्हा एकदा कुटुंब एक होऊन कुटुंब संस्था राखली जाईल…यात शंकाच नाही…!

*(दीपी)*
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + fourteen =