You are currently viewing १ एप्रिलपासून १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

१ एप्रिलपासून १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

*’बेस्ट’चा ग्राहकांना झटका*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडले असताना करदात्या मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे पाठवला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती सूचना मागवल्या आहेत. परंतु विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिल्यास १ एप्रिलपासून १० लाख ८० हजार वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे.

बेस्ट उपक्रमाचे १० लाख ८० हजार वीज ग्राहक असून, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून विद्युत विभागातील कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात. १० लाख ८० हजार वीज ग्राहकांमध्ये ८ लाख निवासी, तर ३ लाख व्यावसायिक ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतात. त्यात कोरोनामुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित बिघडले होते आणि कोरोनाचा फटका बेस्ट उपक्रमाला बसला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाने वीज दरवाढ केली नव्हती. त्यामुळे यंदा सन २०२३-२४ या वर्षांसाठी वीजदरात वाढ करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. विद्युत नियामक आयोग बेस्ट उपक्रमाच्या प्रस्तावावर काय निर्णय घेईल, त्यानंतर वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 4 =