You are currently viewing रान भाज्या
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

रान भाज्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*रान भाज्या…*

लहानपणी मी गंमत म्हणून बैलगाडीत बसून किंवा पायी देखील रमत गमत शेतात जात असे.कधी सालदारचा डबा
उशिरा आला तर तो द्यायला मला शेतात जावे लागे.बैलगाडी
सकाळीच शेतात निघून जात असे. मग ती भाकरी घेऊन
मी शेतात जात असे. बाभळीच्या झाडांवर भरपूर सुगरणीची
घरटी असत. ती बघायला मजा येत असे. तिथेच काटेरी
बोरी हॅ बोरांनी लगडलेल्या असत. मग काय ? हलवायचे
झाड की पटा पटा हिरवी पिवळी बोरं दणादणा पडत असत.
मग त्यातली गोड गोड ओच्यात भरायची नि खात खात
रस्ता कापायचा. तेवढ्यात ओढा लागायचा . झुळूझुळू
वाहणाऱ्या झऱ्यात उगीचच हातपाय धुवायचे नि चालू
लागायचे. तेवढ्यात मग शेत दिसू लागे. मोटेवर सालदार
बसलेला दिसे व कुई कुई अशा मोटेच्या आवाजा बरोबर
त्याची ललकारीही कानावर पडे. मोठी मजा वाटायची
तेव्हा. भाकरीचे गाठोडे झाडाला टांगायचे नि थाळण्यातून
नागिणी सारखे सुसाट मेरे तून शेतातल्या बाऱ्यात धावणारे
पाणी बघायचे.एक जण बारे धरत उभा असे.

खरीपाचा हंगाम असेल तर ज्वारी बाजरी मोठ्या तोऱ्यात
बांधाबांधाने डोलतांना दिसत. खूप शेतकरी शेंगा म्हणजे
भुईमुग पेरत असत.ठेंगण्या शेंगदाण्याच्या रोपांना जमिनीत
घुंगरा सारख्या शेंगा लगडलेल्या असत. त्या रोपाला “डक्स”
म्हणत. ते उपटलं की छोट्या छोट्या शेंगा दिसत. थाळण्यात
ते धुवायचं नि मस्त ओल्या शेंगा बांधावर बसून खायच्या.
तेवढ्यात मोटेवरून सालदार उतरायचा व बांधा बांधाने
झुडपात हात घालून कोवळे कोवळे” वाळीक”( काकडी
सारखे पण थोडे आखूड)३/४ तरी तोडून माझ्या हातात
द्यायचा. फार चविष्ट असायचे ते ताजे वाळीक !एखादे
खाऊन बाकी घरी न्यायचे.

आईने निघतांनाच सांगितलेले असायचे,”आंबाडीनी भाजी
नि कांदानी पात लई ईस बरं!” शेतात अंबाडीची भाजी असे.
ह्या अंबाडीला नदीत भिजवून शेतकरी घरीच त्या साली पासून दोर बनवतात व गाई बकऱ्यांसाठी वापरतात.सालदार एक जुडी होईल एवढी आंबाडी काढून ७/८ रोपाचे कांदे ही
उपटून द्यायचा.तेच ताजे कांदे बांधावर बसून आम्ही चटणी
भाकरी बरोबर खात असू. कधी पोकळा, आंबटचुका, मिरची
ही पेरलेली असे. बांधावर भले मोठे लिंबाचे व हादग्याचे झाड
होते. ती हादग्याच्या फुलांची गरमागरम भाजी तर आई
गोधड्या धुवायला शेतातल्या विहिरीवर यायची तेव्हा
चुलीवरील वरण बट्ट्यां सोबत नेहमीच खायला मिळायची.
वाळीक बरोबर शेतात शेंदोड्याही पेरलेल्या असत. ह्या
आंबट तुरट शेंदोड्या चिरून त्यांना मीठ लावून आई मडक्यात
भरून ठेवायची, जोडीला कोवळी गवार खुडून ती ही
वाळवली जायची. मंडळी, वडील जेवायला बसले की आई
ह्या शेंदोड्या व गवार थोड्या तेलात तळून जेव्हा डावी कडे
तोंडी लावणे म्हणून वाढायची, काय सांगू तुम्हाला ते कुडुम
कुडूम खायला किती मजा यायची! मी इथे आई सारखा
गवार वाळवण्याचा प्रयत्न केला पण आई सारखा नाहीच
जमला.शेतात तांदुळक्याची भाजी तर नेहमीच मिळते. तिला
पेरावीच लागत नाही, ती आपोआप येते व कांदा लसूण
घालून फार चविष्ट लागते. नाशिकला तांदुळका मिळत नाही.
माठाची भाजी मिळते जी मला फारशी आवडत नाही.

आणखी मला आठवते ती हरभऱ्याची रोपे वाढली की त्यांचे
तुर्रे खुडून केलेली कच्ची तिखटमीठ घालून केलेली चटणी
किंवा वाळलेली हरभऱ्याची पीठ पेरून,वाळलेली बोरे घालून घेरून केलेली व गरमा गरम भाकरी बरोबर खाल्लेली पातळ
भाजी! वाह रे वा! काय मज्जा होती हो रानातल्या भाज्यांची!
तशीच आंबटचुक्याची पीठ पेरून घेरून भाजी मी आज ही
करते. चिलू, घोळ या भाज्या नाशिकलाही मिळतात. आदिवासी तर फक्त रानभाज्या नि नागलीची भाकरी खातात व तंदुरूस्त राहतात. मेहनतीची कामे करूनही थकत नाहीत ते!
अनेक रानभाज्या ज्या आदिवासी भागात मिळतात त्यांची
नावे ही आपल्याला माहित नाहीत .

हल्ली कुठे कुठे रानभाज्यांचा महोत्सव भरवून त्यांचे महत्व
अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतांना दिसतो आहे ही चांगली
गोष्ट आहे.या विविध गुणकारी व व्हिटॅमिन्सचा स्रोत असलेल्या भाज्यांची कास आपण धरली तर रोगांचे भयावह
वाढलेले प्रमाणही कमी होईल असे वाटते.हल्ली तर आपण
सारे प्रदूषित व फवारलेले अन्नच खातो. त्या मुळे कॅन्सर सारख्या रोगांचे प्रमाण फारच वाढले आहे,ते कमी होऊ शकेल असे वाटते.! शुद्ध व स्वच्छ अन्न सेवन केल्यास प्रकृतीचे प्रश्न
नक्कीच सुटतील पण डोळसपणे आपण तसा प्रयत्न करायला
हवा. तरच आपल्याला भविष्यकाळ आहे हे लक्षात ठेवा.

“धन्यवाद….”

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ६ जानेवारी २०२३
वेळ: दुपारी १२:२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 3 =