नगरपालिकेच्या चालढकल खुलाश्यावर उपोषणकर्त्यांची नाराजी
सावंतवाडी
सावंतवाडी शहर जिल्ह्यातील, राज्यातील विकसित व स्वच्छ शहर म्हणून वेळोवेळी गजर होत असतानाच गेली ४० वर्षे शहरात राहूनही विकासापासून वंचित असलेल्या सावंतवाडीच्या सालईवाड्यातील रहिवाशांनी अनेकदा निवेदने, आंदोलने, दोन वेळा मुलाबाळांसह उपोषणे केली आहेत. परंतु वेळोवेळी सदरची जागा राजघराण्याशी संबंधित असल्याने केवळ कागदी खेळ करून आश्वासनांवराच रहिवाशांची फसवणूक केली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून सौ.भूमी महेंद्र पटेकर सह तब्बल ९० रहिवाशांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारी २०२३ ला नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसण्याचा इशारा वजा सूचना नगरपालिका सावंतवाडी, तहसीलदार सावंतवाडी, उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सावंतवाडी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सावंतवाडी पोलिस स्टेशन आदींना दिनांक ७/१२/२२ रोजी अर्जाद्वारे दिली होती.
स. नं. ४५ अ १/१६, चराठे (म्यु. हद्द) सि. स. क्र. ५७६६ सावंतवाडी महिला समाज (आश्रम) या जागेतून जाणारा रस्ता सार्वजनिक म्हणून घोषित न झाल्यास लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याबाबत सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयास स्मरणपत्र सादर केलेले होते. जवळपास दीड महिना उलटून गेल्यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेकडून “सदरचा रस्ता हा महिला समाज (आश्रम) जागेतून जात असल्याने जागा मालक महीला समाज (आश्रम) यांना कळविल्या पासून एक महिन्याचे आत सदर रस्ता सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्याबाबत लेखी म्हणणे प्राप्त झाल्यावर त्याबाबतची नियमानुसार पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत वर नमूद प्रकरणी कार्यवाही सुरू असल्याने आपण उपोषणाचा मार्ग अवलंबून नये”, अशा प्रकारचे पत्र सावंतवाडी नगरपरिषदेकडून दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी देण्यात आले आहे. सदर पत्रात नमूद सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाकडील जा.क्र.२६७८ दि. २७/१२/२०२२ रोजी महिला समाज (आश्रम) सावंतवाडी यांना पत्र पाठविले गेले. परंतु सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाला ०७/१२/२०२२ रोजी उपोषणकर्त्यांनी स्मरणपत्र दिलेले असताना देखील तब्बल वीस दिवसांनी म्हणजे २७/१२/२०२२ रोजी देऊन २६ जानेवारीचा उपोषणाचा दिवस हा महिला समाज (आश्रम)च्या मालकांना दिलेल्या एक महिन्याच्या मुदती पूर्वी यावा जेणेकरून उपोषण होऊ नये व पुन्हा नगरपरिषदेच्या कागदाच्या खेळावर विश्वास ठेऊन रहिवाशांनी शांत रहावे. अशा प्रकारचे नियोजन करूनच सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाकडून पत्र पाठविले गेले की काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या ठराव क्र.१५६ दि. १७/१२/२०१४ नुसार सदरचा रस्ता सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित केलेला होता, त्यावेळी सदरच्या रस्त्यावर कोणीही मालकी हक्क सिद्ध करू शकले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण २०१५ मध्ये मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठविण्यात आले होते. परंतु माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडून देखील गेल्या आठ वर्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसून सावंतवाडी नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील सदरच्या रस्ता प्रकरणी साफ दुर्लक्ष केलेला आहे. गेली ३५ ते ४० वर्षे सालईवाडा भागातील शेकडो रहिवासी नगरपरिषद कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेऊन घरे, बंगले, इमारती बांधून या भागात राहत आहेत. नगरपरिषद रहिवाशांकडून कर भरून घेत असल्याने प्रभागातील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविणे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. तरीदेखील विकासात्मक काम करण्याच्या दृष्टीने सावंतवाडी नगरपरिषदेने कोणतीही तसदी आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेने उपोषणाच्या एक दिवस अगोदर जावक क्रमांक ३०११ दि. २३/०१/२०२३ च्या पत्रानुसार नुसार दिलेल्या खुलासावर सौ.भूमी महेंद्र पटेकर वगैरे ८९ रहिवासी रा.सालईवाडा, सावंतवाडी यांचे समाधान झाले नसल्याने दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजीचे नियोजित सावंतवाडी नगर परिषदेसमोरील उपोषण करण्यावर रहिवासी ठाम आहेत.