*हॉकी विश्वचषक २०२३ : प्रबळ दावेदार भारताचे आव्हान संपुष्टात*
*सडन डेथ शूटआऊटमध्ये न्यूझीलंड ५-४ ने विजयी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
अत्यंत अटीतटीच्या आणि चित्तथरारक क्रॉसओवर सामन्यात शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारतावर ५-४ ने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या पराभवाबरोबरच हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. विजेतेपद पटकावून चषक उंचावण्याचे भारताचे स्वप्न भंगले. पूर्ण वेळ संपेपर्यंत सामना ३-३ असा बरोबरीत राहिला, पण डेथ शूटआऊटमध्ये भारताने सामना गमावला. भारत प्रबळ दावेदार असूनही न्यूझीलंडने चमकदार कामगिरीच्या जोरावर बाजी मारली.
तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारताने ३-२ अशी आघाडी मिळविली होती. खेळाच्या सहाव्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांनी गोल डागण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. बाराव्या मिनिटाला भारताला कॉर्नर मिळाला. कर्णधार हरमनप्रीतने ड्रॅग फ्लिकने गोल करण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला.
सतराव्या मिनिटाला भारताला गोल करण्यात यश आले. न्यूझीलंडचा बचाव भेदून ललित कुमारने गोल करत भारताला १-० आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चोविसाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर सुरजीतने विश्वचषकातील आपला पहिला गोल करत भारताची आघाडी वाढवली. अठ्ठाविसाव्या मिनिटाला न्यूझीलंडसाठी फाइंडले, चाइल्ड आणि लेन यांनी मिळून एक गोल करत न्यूझीलंडच्या आशा पल्लवित केल्या. चाळीसाव्या मिनिटाला वरुणने न्यूझीलंडच्या गोलरक्षकाच्या पायांमधून चेंडूला गोलपोस्टचा मार्ग दाखवला.
तिसऱ्या क्वार्टरच्या अंतिम क्षणात ४४ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या रसेलने श्रीजेशच्या पायामधून चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला. चौथ्या क्वार्टरमध्ये सामना अत्यंत रोमांचक झाला. पन्नासाच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर फाइडलेने गोल करुन न्यूझीलंडला ३-३ अशी बरोबरी साधून दिली. ५३ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरचा फायदा उचलता आला नाही.
साठाव्या मिनिटाला दोन्ही संघांची ३-३ अशी बरोबरी राहिल्याने सामना शूटआऊटमध्ये गेला. पहिल्या शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी तीन गोल केले. सामना अर्थातच सडन डेथ शूटआऊटमध्ये खेळविण्यात आला. सडन डेथ शूटआऊटमध्ये भारताचा निभाव लागू शकला नाही. भारताला ५-४ ने पराभव पत्करावा लागला. हार्दिक सिंगच्या अनुपस्थितीत मनदीप सिंग आणि आकाशदीप यांच्यावर कमालीचा दबाव आला होता.