दोडामार्ग
दोडामार्ग बाजारपेठेतील पिंपळेश्वर देवस्थान परिसरापासून ते आयी रोडवरील मराठी शाळेपर्यंतच्या रस्त्याची उंची वाढवण्यात येणार असून बाजारपेठ परिसरातील मोऱ्यांची देखील नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. असे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी आज आज स्पष्ट केले आहे. नगराध्यक्ष चेतन चव्हाण तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत शाखा अभियंता चव्हाण यांनी या परिसरात पाहणी करत आवश्यक ती मोजमापे घेतली. व लवकरात लवकर ही कामे मार्गी लावणार असल्याचेही सांगितले.
येथील बाजारपेठेतील पिंपळेश्वर चौकातून आयी दिशेने गेलेल्या राज्यमार्गावर वसंत सांस्कृतिक कलाकेंद्र ते बीएसएनएल टॉवरपर्यंतचा परिसर पावसाळ्यात पूर्णत: जलमय होतो. दोडामार्ग – आयी या रोडवरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालक, पादचारी यांना पावसाळ्यात या भागातून ये जा करणे नकोसे होत होते. भर रस्त्यात पडणारे खड्डे व रस्ताभर पसरणारे मातीयुक्त पाणी याला या भागातील रहिवासी अक्षरशः कंटाळले होते. एकतर रस्त्याच्या दुतर्फा गटारे उभरावीत किंवा थेट रस्त्याची उंची वाढवावी अशा मागण्या नागरिकांमधून व्यक्त होत होत्या.
तसेच पिंपळेश्वर सभागृह नजीकची मोरी व त्याचबरोबर सावंतवाडी रोडवरील गावडेवाडी रोडच्या प्रवेशद्वारावरील मोरी या दोन्ही मोऱ्या नव्याने बांधून काढण्याची मागणी व्यक्त होत होती. नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवकांनी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे काही दिवसांपूर्वी भेट घेऊन शहरातील सर्व रस्ते , मोऱ्या तसेच अन्य तत्सम कामांसंदर्भात लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांच्या निर्देशानुसार आज येथील बांधकाम विभागाचे अभियंता विजय चव्हाण,घंटे यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली व आवश्यक ती मोजमापे घेतली. यावेळी नगराध्यक्ष श्री. चव्हाण, न. पं. चे बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर, मनोज पार्सेकर तसेच ठेकेदार स्वप्नील निंबाळकर आदी उपस्थित होते.