ताबडतोब फेरविचार न केल्यास घेराव घालणार : सरपंच शंकर नाईक यांचा इशारा
बांदा
आरोस-धनगरवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना मंजूर असून एकूण 25 कुटुंबे राहत आहेत. त्यापैकी पाच कुटुंबे सर्वेतून पूर्णतः वगळण्यात आली. सदर सर्वे चुकीच्या पद्धतीमुळे झाल्याने आम्हाला पाण्यापासून वंचित राहावे लागणार असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा असे निवेदन आरोस सरपंच शंकर नाईक यांना ग्रामस्थांनी दिले.
अतिदुर्गम भागातील धनगरवाडीचा विचार करता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नाही. येथे 25 कुटुंबे वास्तव्यास असून त्यापैकी पाच कुटुंबांना पाण्याच्या झालेल्या सर्वेतून वगळण्यात आले. नळ योजनेचे काम पूर्ण होत असल्याने अन्य कुटुंबांना पाणी मिळणार व आम्हा पाच कुटुंबांची तहान कोण भागवणार. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वंचित राहिलेल्या पाच कुटुंबांना सदर नळ योजनेत समाविष्ट करावे. तसेच योग्य प्रकारे पुन्हा एकदा सर्वे करावा व पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आरोस-धनगरवाडी ग्रामस्थांनी सरपंचांकडे केली. उपसरपंच सरिता नाईक यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गुरू आरोसकर उपस्थित होते.
दरम्यान, सरपंच शंकर नाईक म्हणाले की, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रक तयार करताना केलेल्या चुकीमुळे सदर पाच कुटुंबे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. संबंधित विभागाने ताबडतोब फेरविचार करून वंचित कुटुंबाना न्याय द्यावा अन्यथा पाण्यासाठी घेराव घालावा लागेल असा इशारा सरपंच शंकर नाईक यांनी दिला.