*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्ग संवर्धन …*
मित्र आपुले सगे आपले सोयरेच आपुले
आपल्यासाठी उन्हात पहा ना दिनरात तापले..
स्वत: घेऊनी डोईवरती ऊन नको इतरांना
पर्णछाया दाट टाकती सुखावती सकलांना…
पाणी टाका नाही टाका जीवनास देतात
फुले फळे अन् पर्ण पाकळ्या घेऊन ते हातात
सुवास देती सुंदरतेचे सदैव दालन उघडे
कुऱ्हाड घेऊन हाती करतो त्यांचे तुकडे तुकडे
प्राणवायु नि सुवासिक तो चंदन, औंदुंबर
वड पिंपळावरती करती पक्षी सुंदर घरं
पळस पांगारा नि सागाची ती सुंदर बने
त्यास पाहता हर्षून जाती दुर्मुखलेली मने..
रात्रंदिन ते सेवा करती नद्या नि नाले वायु
विसंबून हो आहे आपुली त्यांच्या वरती आयु
ते नसले तर … अबबबब, आम्ही सुद्धा नसू
त्यांस पाहता मुखकमलावर आपसुक फुटते हसू…
घरात आमुच्या दारी आमुच्या झुलतो सुंदर झुला
मला वाटते वृक्षांची करावी आम्ही सुंदर “तुला”
उपकार ना त्यांचे फिटती जन्म किती घेतले
जीवन आमुचे सर्वस्वी हो त्यांच्यावर बेतले…
सुखात तेच दु:खातही साथ न सोडती कधी
सरणावरती थेट येती नि मटक्यातून उदधी
पंचमहाभुतांचे साथी पंचतत्वी नेतात
निसर्ग आहे देव आपला जन हो ….
घ्या ध्यानात ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २१/१/२०२३
वेळ: ४/२४