You are currently viewing माणसातील माणूसपण हरवले आहे

माणसातील माणूसपण हरवले आहे

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*माणसातील माणूसपण हरवले आहे*

माणसातले माणूस पण हरवले आहे असे वाटण्यासारख्या अनेक घटना आपल्या भोवती घडत असतात. एखादी बातमी वाचली, ऐकली की अंगावर सरसरूनन काटा उभारतो. मन नुसतेच उदास होत नाही तर बेचैन होते.अस्वस्थ होते. मनात अत्यंत नकारात्मक विचार प्रवाह सुरू होतात. काय चाललंय हे जगात? कुठे गेला धर्म? कुठे गेली संस्कृती? कुठे गेली नीती,माणूसकी? साऱ्याच गुणांचा ऱ्हास झालाय. आणि अवगुणांच्या ढगाने आकाश व्यापले आहे
.
कुणी प्रेयसीचा खून करून तिच्या देहाचे तुकडे करतो, कोणी संपत्तीसाठी जन्मदात्यांची हत्या करतो, सहज शक्य होणारे सहकार्य ही देण्यास पटकन कोणी तयार होत नाही, रस्त्यावर एखादा अपघात झाला तर लोक बघ्याची भूमिका घेतात, नाहीतर त्याचं मोबाईल मध्ये चित्रण करतात. लहानथोर वृद्ध कोणाच्याही बाबतीतले मूल्यावर्धित संकेत पाळायची कोणालाही गरज वाटत नाही. जो तो फक्त स्वतःपुरतेच पाहत आहे. सारा समाज नासलाय. संवाद हरवलाय. नाती हरवली आहेत. माणूस, माणूस उरला नाही. जागतिक स्तरावरही अहंकार, वर्चस्व, बळ, शक्ती यांचे, विनाकारण पेटवणाऱ्या युद्धातून प्रदर्शन पाहायला मिळते. पण हे कशासाठी! आणि हा हिंसाचार काय मिळवण्यासाठी? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. वैश्विक या शब्दाचा अर्थ उलगडत नाही. कुटुंब या संस्थेची व्याख्या सापडत नाही. माणूसच हरवलाय. माणूसपणाला तिलांजली दिली आहे. बहिणाबाईंच्या ओळींमधून म्हणायचं तर खरोखरच, “माणसा माणसा कधी होशील माणूस” हेच म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

या सर्व विचारांनी खरोखरच डोकं भणभभणतं. नैराश्य येतं. नको जगणं असंही वाटू लागतं. पण मग कुठेतरी एखादा पक्षी हळूच जवळून जातो. कुंडीत नकळत फुललेलं एखादं छान सुगंधी फुल दिसतं. कुठे तरी वातावरणात सुरेल सूर ऐकू येतात. निरभ्र आकाशातही एखादी चुकार चांदणी दिसते. आणि मग मनात एक अनामिक आनंदाची लहर झुळझुळून जाते. आणि मग अभय बंग, राणी बंग, प्रकाश आमटे, मेधा पाटकर, सयाजी शिंदे यासारखे अनेक,समाजाच्या मानसिक, शारीरिक आणि सौख्यासाठी झटणारी माणसं आणि त्यांचं निस्वार्थ तळमळीने केलेलं कार्य पाहताना मनात आशेचे किरण चमकतात. प्रत्येक सण सोहळ्याला होणाऱ्या शुभेच्छांचा वर्षाव कोसळतो. भले तो स्पर्धात्मक, आभासी असेलसे अथवा बेगडी असू शकेल, पण काही तथ्यांश तर टिकून आहेच ना? संस्कृती आणि मनुष्य मनाला जोडणारा एक धागा सांभाळतोच ना.

कोविडच्या काळात माणसं एकमेकांशी किती सहकारी भावनेने वागत होते! वादळ, दुष्काळ, भूकंप,भूस्खलन,पूर अशांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी माणसातला माणूस जागा झालेला आपण अनुभवतोच ना?” तिळगुळ घ्या गोड बोला” यासारखे प्रातिनिधिक संदेश असोत, ईद मुबारक असो, किंवा मेरी ख्रिसमस असो, वाहेगुरू असो, अथवा वाले को सलाम असो, पण आजही या शब्दांची देवाण घेवाण सहजपणे होतच असते. शुभ प्रभात म्हणा किंवा गुड मॉर्निंग म्हणा पण ही शाब्दिक संस्कृती माणूसपण,माणसा माणसात असलेलं काहीतरी कणभर तरी टिकवण्यासाठी आधारभूत ठरतेच ना?
तेव्हां सगळंच काही वाईट नाही. आपला फोकस महत्त्वाचा आहे. दृष्टी महत्त्वाची आहे. माणसातले माणूस पण हरवले आहे असं म्हणण्यापेक्षा माणसं चांगलं बघणं विसरलेले आहेत. माणूसपण हरवलेलं नाही ते काहीसे धुंद झालय्. कुठल्याशा धुरळ्यामध्ये अदृश्य झाले आहे. आणि हा धुरळा म्हणजे नेमकं काय याचा शोध घेतला आणि त्याला फुंकर घातली तर माणूसपण पुन्हा सदृश होईल. माणसातले माणूस पण हरवले आहे हा नकारात्मक विचार न करता मने जोडण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत.नकारात्मकतेने विश्वासार्हता लयास जाते. संशय वाढतो. भय दाटते. आणि मग माणूस कोषात जातो. फक्त स्वच पाहू लागतो.भय इथले संपत नाही ही स्थिती बदलली तरच मैत्रीचे शांत वारे वाहू लागतील. आणि माणसाचे माणूसपण हरवले म्हणण्याची वेळ येणार नाही.

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा